पुणे – स्वतः वर शस्त्राने वार करून तरुणाने इमारतीवरून मारली उडी

विश्रांतवाडीतील एका तरुणाने स्वतःच्या गळ्यावर शस्त्राने वार करून अंगावर जखमा करून घेतल्या. त्यानंतरही जीव जात नसल्यामुळे त्याने इमारतीच्या टेरेसवरून खाली उडी मारली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याने स्वतः वर वार करून का घेतला याबाबत पोलीस तपास करीत आहेत. राहुल रामा सूर्यवंशी (वय 32, मूळ रा. दगडवाडी, ता. निलंगा, जि. लातूर, सध्या रा. कस्तुरभा सोसायटी, विश्रांतवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल हा मोटारीतील माल खाली उतरविण्याचे काम करीत होता. तो पत्नीसोबत विश्रांतवाडीत राहत होता. काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनमुळे त्याची पत्नी गावी गेली होती. त्यामुळे राहुल एकटाच होता. काल त्याने राहत्या घरात स्वतःचा गळा चिरून घेतला. त्यानंतर शरीरावर सर्वत्र जखमा करून घेत जखमी झाला. तरीही जीव जात नसल्याने त्याने इमारतीवरून खाली उडी मारली होती. त्यानंतर विश्रांतवाडी पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र अति रक्तस्त्रावामुळे त्याचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. राहुलने आत्महत्या का केली याचा पोलिस शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या