
सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण टिकावे यासाठी महाविकास आघाडी सरकारने सक्षमपणे बाजू मांडली. दुर्दैवाने न्यायमूर्तींमध्ये 3-2 असे मत झाल्याने आरक्षण रद्द झाले ही वस्तुस्थिती आहे. परंतु कायदेशीर प्रक्रिया न समजून घेता राज्यातील विरोधक महाविकास आघाडी सरकारला दोषी ठरवत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पुणे जिल्हा परिषदेमध्ये आयोजित शिवराज्याभिषेक कार्यक्रमानंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर ते म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयामध्ये ज्या वकिलांनी बाजू मांडत आरक्षण टिकवले तेच वकील सर्वोच्च न्यायालयातही बाजू मांडत होते. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले असते तर आम्हीच या कायद्याचा पाठपुरावा केला होता त्यामुळेच ते मंजूर झाले, असे विरोधक बोलले असते व स्वतःची पाठ थोपटण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता. मात्र न्यायालयात निकाल विरोधात गेल्यामुळे ते आमच्यावर आता टीका करून या मुद्दय़ावरून राजकारण करत आहेत.
माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्दय़ावरून स्वतःला बॉम्बने उडवून घेण्याचा इशारा दिला. यावर अजित पवार यांनी कायदा आणि संविधानात काय आहे ते पाहत नाही. ही लोकं काही काळ आमच्या सोबत होती. त्यांचा आवाका किती आहे हे आम्हाला चांगलेच माहिती आहे, असा टोला त्यांनी लगावला.
संभाजीराजे छत्रपती यांच्याशी आंदोलनाविषयी माझे बोलणे झाले आहे, परंतु त्यांनी 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा होऊ द्या असे सांगितले आहे. त्यांनी आपले प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही मांडले आहेत. त्यावर लवकरच महाविकास आघाडी सरकार चर्चा करून निर्णय घेईल, असे पवार यांनी सांगितले.
पहाटेच्या शपथविधीवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये शाब्दिक चकमकी सुरू आहेत. चंद्रकांत पाटील यांनी 54 आमदारांच्या पाठिंब्याच्या पत्राबाबत वक्तव्य केले आहे. त्याविषयी बोलताना अजित पवार म्हणाले, जी गोष्ट 14 महिन्यांपूर्वी घडली त्याचे आता काय? ज्यांना उद्योग नाही ते मागच्या गोष्टी उकरून काढत आहेत.
…तर विधानसभेत ठराव
मराठा आरक्षण परत मिळवण्यासाठी माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले आणि मुंबई उच्च न्यायालयात आरक्षणाविषयी बाजू मांडणारे वकील व इतर ज्येष्ठ नेत्यांची मते जाणून घेतली जात आहेत. मराठा आरक्षण परत मिळवण्यासाठी पुन्हा एकदा विधानसभेत ठराव पास करण्याची गरज भासल्यास पावसाळी अधिवेशनात तो मांडला जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.































































