
कोरोना टाळेबंदीचे नियम स्थानिक प्रशासनाने शिथिल केल्यानंतर रविवारी (दि.30) बाजार समितीमधील व्यवहार सुरळीत ठेवण्यात आले होते. मात्र, बाजार समिती सुरू असल्याबाबतचे परिपत्रक शेतकऱ्यांपर्यंत योग्य वेळेत न पोहचल्याने बाजारात भाजीपाल्याची अत्यल्प आवक झाली. मात्र, सोमवारपासून (दि.31) आता बाजार समितीचे सर्व व्यवहार पुर्वीप्रमाणे सुरळीत सुरू राहणार आहेत.
स्थानिक प्रशासनाने शनिवार, रविवारचा कडक लॉकडाऊन शिथिल करत आत्यावश्यक सेवा सकाळी अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. शनिवारी बाजार समितीच्या फळे व भाजीपाला बाजाराला साप्ताहिक सुट्टी असते. मात्र, बाजार समितीकडून वरिष्ठ कार्यालयांशी चर्चा शनिवारी दुपारीच्या सुमारास परिपत्रक काढून बाजार सुरू असल्याचे कळविण्या आले. मात्र, शेतकNयांना सकाळपासूनच शेतमालाची तोडणी करावी लागते. उशीरा निर्णयाची माहिती प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांनी शेतमालाची तोडणी केली नाही. परिणामी बाजारात भाजीपाल्याची केवळ 20 ट्रक, तर बटाट्याची केवळ 2 ट्रक तर, कांद्याची एकही ट्रक आवक झाली नव्हती.
मार्केटयार्ड आता रविवारीही राहणार सुरू
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेला कडक लॉकडाऊन शनिवारी (दि. 29) पासून रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे, गेल्या दीड महिन्यांपासून दर रविवारी बंद असणारे मार्केटयार्डातील तरकारी, फुले, फळे, कांदा-बटाटा, पान व केळी विभाग रविवारपासून (दि. 30) पासून साप्ताहिक सुट्टी वगळून सुरू राहणार आहे. याखेरीज, उपबाजारही सुरू राहणार आहेत. बाजार पुर्ववत सुरू झाला असून बाजार घटकांनी कोरोना नियमावलीचे पालन करत व्यवहार पार पाडावे, असे आवाहन पुणे बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी केले आहे.






























































