पुणे शहरातील संघटित गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कंबर कसली आहे. त्यानुसार मकोका कायद्याचा सक्षमपणे वापर सुरु करीत कारवाईचा बडगा उगारला आहे.
पुणे शहर आयुक्त पदाची सूत्रे स्विकारताच मकोका, तडीपारी आणि प्रतिबंधात्मक कारवाईवर भर देउन गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण केली आहे. त्यानुसार मागील 11 महिन्यात मकोका नुसार कारवाईचे त्यांनी अर्धशतक केले आहे. सराईत आरोपी बल्लूसिंग टाक टोळीविरूद्ध मकोका ची 50 वी कारवाई करण्यात आली आहे.
सराईत आरोपी बल्लूसिंग प्रभूसिंग टाकसह टोळीतील साथीदार उजालासिंग पभूसिंग टाक, सोमनाथ घारोळे, पिल्लूसिंग जुन्नी, जलसिंग दुधानी व गोरखसिंग टाक हे 5 जूलैला मध्यरात्रीच्या सुमारास पंचरत्न सोसायटीमध्ये दरोडा टाकून पळून जात होते. त्यावेळी घटनास्थळी दाखल झालेले पोलीस अधिकारी अंमलदार यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी आरोपींनी पोलीसांवर धारदार हत्याराने हल्ला केला. याप्रकरणी त्यांच्यावर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. टोळीप्रमुख बल्लूसिंग टाक संघटीत गुन्हेगारी टोळी चालवून सन 2008 पासून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत असल्याचे उघड झाले.
आर्थिक फायद्यासाठी दरोडयाची तयारी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्र बाळगुन दहशत माजविणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे टोळीने केले आहेत. यापुर्वी त्यांच्याविरूद्ध प्रतिबंधक कारवाई तसेच हद्दपारी सारखी ठोस कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांच्यावर परिणाम झाला नव्हता. त्यामुळे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली कोथरूडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी अपर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे, उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्यावतीने कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार टोळीविरूद्ध मकोका नुसार कारवाई करण्यात आली आहे.
शहरातील नागरिकांना भयमुक्त वातावरणात जीवन जगता यावे, त्यासाठी गुन्हेगारी रोखण्यावर भर देण्यात आला आहे. विशेषतः संघटित गुन्हेगारी टोळ्यांना धडा शिकविण्यासाठी मकोका नुसार कारवाई केली जात आहे. त्यामुळे गुन्हेगारी घटण्यास मदत होणार आहे. नागरिकांच्या सुरक्षितेसंदर्भात वेळोवेळी खबरदारी घेण्यात येत आहे. – अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर


























































