नवले पूलानजीक पुन्हा ट्रकने 9 वाहनांना दिली धडक; दोन जण जखमी, सुदैवाने जीवितहानी नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील नवले ब्रीज परिसरात अपघातांचे सत्र कायम असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. आज दुपारी बाराच्या सुमारास कात्रज रस्त्यावरून नवले पुलाच्या दिशेने चाललेल्या एका मालवाहतुक ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याने 9 वाहनांना धडक दिली. त्यामध्ये 7 चारचाकी, रिक्षा आणि एक दुचाकीचा समावेश आहे. अपघाता दोन जण जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिस आणि वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी दुपारी बारा ते साडेबाराच्या सुमारास कात्रज रस्त्यावरून नवले पुलाच्या दिशेने एक मालवाहतूक ट्रकचालक (एम एच 12 एल टी 4755) निघाला होता. ट्रक बाबजी पेट्रोल पंपाच्या पुढे आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे त्याने समोरील वाहनांना धडक देण्यास सुरूवात केली. अचानक ट्रकचालकाने वाहनांना धडक दिल्यामुळे नागरिकांची आरडाओरड सुरू केली. चालकाने 7 चारचाकी, रिक्षा आणि एक दुचाकीला ठोकर दिली. अपघातची माहिती स्थानिक नागरिकांनी भारती विद्यापीठ पोलीसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रस्त्यावरील वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.

क्रिकेट खेळण्यासाठी चाललेल्या मुलांचे नशीब बलवत्तर

बालेवाडी स्टेडियमला क्रिकेट खेळण्यासाठी निघालेल्या मुलांच्या मोटारीला ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामुळे मोटार रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळली. सुदैवाने मुलांना कोणतीही दुखापत झाली नाही. ताबा सुटल्यामुळे पाठीमागून ट्रक वाहनांना धडक देत असल्याचे पाहून अनेकांनी प्रसंगावधान दाखवत वाहने बाजूला घेतल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.