पुणे- एनडीए परिसरातून 12 चंदनाची झाडे चोरीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यामधल्या खडकवासला परिसरातील एनडीए परिसरातून चोरट्यांनी 12 चंदनाची झाडे तोडून नेली आहे. ही घटना 1 ते 21 ऑगस्टदरम्यान घडली आहे. याप्रकरणी सुरक्षारक्षक संजय मोरे (वय 53, रा. एनडीए) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील खडकवासला परिसरात एनडीए संस्था आहे. त्याठिकाणी परिसरात मोठ्या प्रमाणात चंदनाची झाडे आहेत. 1 ते 21 ऑगस्टदरम्यान चोरट्यांनी सुरक्षारक्षकांची नजर चुकवून परिसरात प्रवेश मिळविला. त्यानंतर 18 हजार रुपये किमतीची चंदनाची झाडे जमिनीपासून कापून नेली.

काही दिवसांनी सुरक्षारक्षक परिसरात पेट्रोलिंग करीत असताना चंदनाची झाडे चोरीला गेल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर त्यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे अधिक तपास करीत आहेत.