राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) दैनंदिन प्रशिक्षण सुरू असताना एका विद्यार्थ्याचा (कॅडेट) जागेवर कोसळून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. 25 सप्टेंबर) सकाळी ‘एनडीए’च्या परिसरामध्ये घडली. संबंधित विद्यार्थी मालदीवचा असून याप्रकरणी मालदीवच्या दुतावासालाही माहिती देण्यात आली आहे. त्याशिवाय पोलिसांकडेही नोंद करण्यात आली आहे. कॅडेट मोहम्मद सुलतान अहमद (वय 21, मुळ रा. मालदीव) असे मृत्यु झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जैतापुरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमद हा ‘एनडीए’च्या 145 व्या तुकडीतील विद्यार्थी होता 12 मार्च 2021 पासून प्रशिक्षणासाठी दाखल झाला होता. सध्या त्याचा अभ्यासक्रमाचा दुसरा टप्पा सुरु होता. नेहमीप्रमाणे ‘एनडीए’मधील प्रशिक्षणाचा भाग असणारा ‘जोश रन’ हा धावण्याचा उपक्रम शनिवारी सकाळी घेण्यात आला. त्यावेळी अहमद अचानक जागेवरच कोसळला असता त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपुर्वीच त्याचा मृत्यू झाला. याबाबत अहमदचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण शोधण्यासाठी शवविच्छेदन करण्यात येणार आहे. घटनेच्या चौकशीचे न्यायालयीन आदेशही देण्यात आले आहे. याप्रकरणी मालदीवच्या दूतावासालाही खबर देण्यात आली आहे. घटनेचा अहवाल पोलिस प्रशासनाकडे पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, मालदीव दुतावासाशी चर्चा करून लष्करी सन्मानासह मृतदेह मालदीवला पाठविण्यासाठीची व्यवस्था करण्यात येत आली असल्याची माहिती लष्करातर्फे देण्यात आली आहे.




























































