Pune News – पीएमपीएमएल बसच्या धडकेत 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, गर्भवती बहिण गंभीर जखमी

तळवडे-निगडी रस्त्यावर पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) च्या इलेक्ट्रिक बसच्या धडकेत 9 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. अपघातात तिची गर्भवती बहीण गंभीर जखमी झाली आहे. मंगळवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुधा बिहारी लाल वर्मा (9) असे मयत मुलीचे तर राधा राम वर्मा (25) असे जखमी गर्भवती बहिणीचे नाव आहे. जखमी राधाला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी बस चालक किरण पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बाळंतपणामध्ये मदतीसाठी राधाने तिच्या गावातील धाकट्या बहिणीला बोलावले होते. राधा आणि तिचा पती तळवडे येथील एका वर्कशॉपमध्ये काम करून जेवण करून परतत असताना हा अपघात झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने बसची तोडफोड केली. पोलीस आणि वाहतूक अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. अलिकडच्या काळात या मार्गावर अपघात वाढले असून स्थानिकांनी रस्ता सुरक्षा सुधारण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बसच्या तोडफोडीनंतर तळवडे-निगडी मार्गावरील बस सेवा तात्पुरती थांबवण्यात आली होती. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र बस सेवा थांबवल्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. अपघातग्रस्त बस देहूरोड पोलीस ठाण्यात नेण्यात आली. पीएमपीएलच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.