
पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्ड आवारातील गुळ-भुसार विभागात अनधिकृत बांधकाम प्रश्नावर अधिवेशनात चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे मार्केटयार्डात एका भूखंडधारकाने तब्बल ९ गुंठे क्षेत्रावर अनधिकृत मजले चढवून बांधकाम सुरू केल्याचे समोर आले आहे. कोणत्याही परवानगीशिवाय हे काम सुरू असून यामध्ये लाखोंचा गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाला पाठीशी घालणाऱ्या पणन मंत्र्यांना कधी जाग येणार असा सवाल आता उपस्थित झाला आहे.
मार्केटयार्डात गुळ -भुसार विभागातील भुखंड वाटप केल्यानंतर त्यावर बांधकामासाठी महापालिकेची परवानगी आवश्यक असते. मात्र, भुसार विभागात महापालिकेने दिलेल्या प्रत्यक्ष परवानगीशिवाय अतिरिक्त बांधकामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. तर, संचालक मंडळाच्या काळात जोरदार अनधिकृत बांधकामे केली असून अत्ताही जोरदारपणे सुरू आहेत. मार्केटयार्डात गुळ भुसार बाजारात सुमारे ३ गुंठे आकाराचे भूखंड आहे. बाजारातील भुखंड क्रमांक ४४७, ४४८, ४४९ असा एकत्रित असलेल्या एस.एस.सेल्स कॉर्पोरेशन या भूखंडधारकाने भूखंडावर अनधिकृतपणे मजला चढवला आहे.
अधिकाऱ्यांचे हात वर
गुळ-भुसार विभागाचे प्रमुख प्रशांत गोते यांना विचारले असता त्यांनी बांधकाम परवानगी स्थापत्य तर कारवाई अतिक्रमण विभाग करत असून आमचा संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. तर, संबंधित बांधकामास कोणतीही परवानगी न दिल्याचे स्थापत्य विभागाचे उपअभियंता अरविंद फडतरे यांनी सांगितले. तर, अतिक्रमण विभागाचे प्रमुख विनायक भरेकर यांना अधिकृत बांधकामांबाबत विचारले असता आम्हाला काही माहीत नसल्याचे सांगितले. तर समितीचे सचिव डॉ.राजाराम धोंडकर म्हणाले, संबंधित भुखंड धारकाला बांधकामासाठी कोणतीही परवानगी दिलेली नाही.
परवानगी नसतानाही ९ गुंठ्यांत बांधकाम कसे?
बाजारात परवानगी न घेता बांधकाम केल्यास बाजार समितीचे कर्मचारी बांधकामाचे साहित्य जप्त करतात. मात्र, कर्मचाऱ्यांना माहिती असणाऱ्या बेकायदा बांधकामाला काहीही धक्का लावत नाहीत. दुसरीकडे एस.एस.सेल्स कॉर्पोरेशन या भूखंड धारकाने कोणतीही परवानगी घेतली नसताना भले मोठे बांधकाम केले आहे. जबाबदार अधिकारीच म्हणता परवानगी दिली नाही. त्यामुळे यात नक्की कोणाचा हात आहे याची चर्चा प्रशासनात सुरु झाली आहे.






























































