Pune News – मार्केटयार्डात मटका, गुटखा, पत्ते जोरात; पोलिसांकडून डोळेझाक

पुणे बाजार समितीच्या मार्केट यार्डात मटका, गुटखा, देशी दारू विक्रीसह अन्य अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर हे सर्व धंदे सुरू आहेत. मात्र मार्केट यार्ड पोलीस जाणीवपूर्वक या अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष करत आल्याचे वारंवार समोर आले आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त आता तरी यात लक्ष घालणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मार्केटयार्ड पोलीस स्टेशनपासून अगदी 100 ते 150 फुटांवर बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर मटक्याचा धंदा जोरदार सुरू आहे. बाजारातील काही वाहनतळाच्या परिसरात, हॉटेलचे पार्किंग तसेच दुपारनंतर काही गाळ्यांवर, मार्केटयार्ड परिसरात रिक्षांमध्ये बसून मटक्याचा धंदा चालवला जात आहे. बाजारात जुगाराचे अड्डे देखील जोरदार सुरू असून देशी दारू, गुटखा, अमली पदार्थांची खुलेआम विक्री सुरू आहे. मात्र पोलीस स्टेशनमधील अधिकारी याकडे डोळेझाक करतात. नुकतेच गुन्हे शाखेच्या युनिट 2 कडून गाळ्यावर सुरू असलेल्या गुटखा विक्रीवर कारवाई केली. गुन्हे शाखा मार्केटयार्डात येऊन कारवाई करून जाते. मात्र, मार्केट यार्ड पोलीस डोळ्यादेखत सुरू असलेल्या अवैध धंद्याकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे एकप्रकारे या अवैध धंद्यांना पाठबळ दिल्याचे स्पष्ट होते. बाजार समितीदेखील याकडे डोळेझाळ करत आहे.

सभापतींचा मनमानी व चुकीचा कारभार सुरू आहे. हे बाजारातील अवैध धंद्यावरून दिसून येते. काही ठराविक संचालकांच्या जवळील कार्यकर्ते गुटखा आणि अवैध धंदे चालवतात. त्याचा हफ्ता त्या संचालकांमार्फत सभापतींना जातो असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. बाजारात सुरक्षा पुरवण्याचे ठेके मनमानी पद्धतीने जवळच्या लोकांना दिले आहेत. मात्र, बाजारात सुरक्षा रक्षक हजर नसतात, असे पुणे बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांनी सांगितले.

नागरिकांनी अवैध धंद्याबाबत पुढे येऊन माहिती द्यावी. माहिती देणाऱ्यांची नावे गुप्त ठेवली जातील. मार्केट यार्डातील मटका, जुगार अड्डे हद्दपार केले जातील, असे परिमंडळ 5 चे पोलीस उपायुक्त डॉ.राजकुमार शिंदे यांनी सांगितले.