Pune News : आळंदीत इंद्रायणी नदीला पूर; पुंडलिक मंदिरात पाणी

राज्याला सध्या मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. अलंकापुरीत इंद्रायणी नदीला आलेल्या पुराचे पाणी दुतर्फा पसरले आहे. नदी काठाचे रस्ते रहदारीसाठी बंद करण्यात आले आहेत. शनी मारुती मंदिर परिसर, राम घाट, भक्त पुंडलिक मंदिर, स्वामी महाराज मठ मागील चौंडी घाट परिसरात पुराचे पाणी घुसले आहे.

पुराचे पाणी पाहण्यास नदी घाटावर तसेच पुलांवर नागरीक गर्दी करत आहेत. पुराचे पाणी पाहत सेल्फीचा आनंद लुटत आहेत. पुरामुळे श्रींचे दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. इंद्रायणी नदीवरील घाटालगतचे महात्मा गांधी यांचे रक्षा विसर्जन स्थळ स्मारकास पाण्याने वेढले आहे. भक्ती सोपान पुलाला पाणी लागले आहे.

नदीचे दुतर्फा रस्ते रहदारीला धोकादायक असल्याने नागरिकांनी, भाविकांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केले आहे. अग्निशमन विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत करण्यात आला असल्याचेही केंद्रे यांनी सांगितले.

आळंदी नगरपरिषदेने नदीचे दुतर्फा कर्मचारी तसेच जीवरक्षक कर्मचारी तैनात केले आहेत. आळंदी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागासह आपत्ती व्यवस्थापन कक्षातून नदी घाटावर नजर ठेवण्यात येत आहे. आळंदीत नदीच्या दुतर्फा रस्ते धोकादायक असल्याने रहदारीस पर्यायी रस्ते वापरण्याचे आवाहन मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी तसेच आळंदी मंडलाधिकारी राजेंद्र वाघ यांनी केले आहे. परिसर कचरामुक्त ठेवण्यास प्रशासनाने प्राधान्य देत पुराच्या पाण्यात वाहून आलेला कचरा व जलपर्णी काढण्याच्या कामास गती देण्यात आली आहे.