
देवाभाऊंच्या राज्यात महिला सुरक्षेचे धिंडवडे निघाले आहेत. पुण्यातील तळजाई टेकडीवर रोज सकाळी पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी येणाऱ्या लेकाRवर 50 ते 60 मस्तवाल पैलवान गुंडांच्या टोळक्याने आज हात टाकला. त्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. दरम्यान, तक्रार करूनही पोलीस दखल घेत नसल्याने त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला. त्यानंतर पोलीस आयुक्तालयावरही धडक दिली.
पुणे फिटनेस अकादमीच्या 150 ते 170 तरुण-तरुणी रोज पोलीस भरतीची तयारी करतात. दररोज तळजाई टेकडीवरील मैदानावर सराव करण्यासाठी येतात. आज नेहमीप्रमाणे हे तरुण-तरुणी सराव करीत होते. तत्पूर्वीच सरावाच्या मैदानात चार पैलवान थांबले होते. तरुण-तरुणींनी या चौघांना बाजूला होण्याची विनंती केली. मात्र त्यांनी तरुणींना धक्काबुक्की करीत तरुणांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दोन पोलीस अधिकारी आमचे मित्र आहेत. त्यामुळे तुम्ही कोणाकडेही गेलात तरी आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही,’’ अशी धमकी पैलवानांसह त्यांच्या साथीदारांनी तरुण-तरुणींना दिली. दरम्यान, रात्री उशिरा सहकार नगर पोलीस ठाण्यात सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.
पाठलाग… मैत्रीसाठी धमक्या
- सरावा वेळी संबंधित गुंड पैलवान अश्लील नजरेने पाहतात.
- अनेकदा नको ती शेरेबाजी करतात.
- फेसबुक, इन्स्टाग्रामवर मैत्री करण्यासाठी वारंवार धमकी देतात.
- रोज घरापर्यंत पाठलाग करतात.
- धक्काबुक्की करत आमचा विनयभंग केला.
आरोपींना वाचवण्यासाठी मंत्रालयातून फोनाफोनी – लेशपाल जवळगे
‘‘राज्यातील विविध ग्रामीण भागांतील मुले पुण्यात अभ्यासाला येतात. मात्र अशा प्रकारच्या काही घटनांमुळे संबंधितांच्या मनावर आघात होतो. आरोपींना वाचवण्यासाठी थेट मंत्रालयातून पोलीस अधिकाऱयांना फोनाफोनी झाली. त्यामुळे संध्याकाळी सात वाजेपर्यंत पैलवानांविरुद्ध गुन्हा दाखल केला नाही,’’ असा गंभीर आरोप ‘वंदे मातरम्’ संघटनेचे लेशपाल जवळगे यांनी केला आहे. ‘‘विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रात्रभर पोलीस आयुक्तालयाबाहेरच शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे,’’ असेही त्यांनी सांगितले.