रुग्णांना बाप्पाचे व्हर्चुअल दर्शन, श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचा उपक्रम

भक्ती आणि सेवेची उदात्त परंपरा कायम राखत सलग दहाव्या वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे ‘इमर्सिव्ह दर्शन’ हे ज्यांना प्रत्यक्ष उत्सवात येणे शक्य नाही, अशांसाठी ट्रस्टने उपलब्ध करून दिले आहे. व्हर्चुअल रिअॅलिटीद्वारे यंदाच्या सजावटीमध्ये प्रत्यक्ष आपण उभे आहोत तसेच थेट गुरुजींच्या शेजारी उभे राहून आरतीत सहभागी झाल्याचा अनुभव रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांनी घेतला. रुग्णालयात असतानाही बाप्पाचे दर्शन घेता आल्याने या रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आणि अजय पारगे, संजय पारगे यांच्या पुढाकारातून कमला नेहरू हॉस्पिटल व कसबा पेठेतील सूर्या सह्याद्री हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी हा उपक्रम राबवण्यात आला. रुग्णांना गणेशोत्सवात गणरायाचे दर्शन घेण्याची इच्छा असते.

मात्र, त्यांना विविध आजारांशी झुंज देत रुग्णालयात राहून केवळ मनामध्ये गणरायाचे रूप साठवावे लागते. अशा रुग्णांना ‘व्हर्चुअल रिअॅलिटी द्वारे आपण प्रत्यक्षपणे उत्सवमंडपात आहोत आणि गणरायाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होत असल्याची अनुभूती घेता आली.