
पुण्यात शनिवारी पुन्हा एकदा गँगवार उफाळून आला. कोंढवा परिसरात गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून एका तरुणाची हत्या करण्यात आली. गणेश काळे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश काळे हा आंदेकर टोळीतील दत्ता काळे याचा भाऊ आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले.
दत्ता काळे हा आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी असून त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर ही हत्या झाली असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे आणि कोंढवा पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश काळे हा रिक्षाचालक आहे. गणेश हा खडी मशीन येथून येवलेवाडीकडे जात असताना भारत पेट्रोल पंपसमोर दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलीस परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची दहा पथके रवाना करण्यात आली आहेत.
































































