Pune news – आयुक्तांच्या बंगल्यातून महागड्या वस्तू गायब, पालिकेच्या सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

पुणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातून अॅक्वागार्ड, चार एसी, झुंबर, पितळी दिवे, दोन टीव्ही, कॉफी मशीन आदी 20 लाखांचे साहित्य गायब झाले आहे. महापालिकेत सर्व विभागांनी आयुक्त बंगल्याच्या जबाबदारीतून हात वर केले आहेत. हा प्रकार समोर येऊ नये म्हणून याबाबत अतिशय गुप्तता पाळण्यात आली. त्यामुळे महापालिकेच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाला आहे.

महापालिका आयुक्तांसाठी मॉडेल कॉलनी येथे अर्ध्या एकर जागेत बंगला आहे. महापालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या आवारात सीसीटीव्हीसह महापालिकेची 24 तास सुरक्षाव्यवस्था आहे. या बंगल्यात पूर्वपरवानगीशिवाय कोणीही ये-जा करू शकत नाही. आयुक्तपदावरून डॉ. राजेंद्र भोसले सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी घराचा ताबा सोडला. त्यानंतर नवीन आयुक्त नवलकिशोर राम या ठिकाणी राहण्यासाठी येणार असल्याने बंगल्याच्या रंगरंगोटीसह इतर कामांची सुरुवात झाली. विद्युत विभागाकडून एसी, टीव्ही, अॅक्वागार्ड यांसह अन्य महत्त्वाच्या वस्तू घेण्यात आल्या. यासह घरातील इतर साहित्य खरेदीसाठी सुमारे 20 लाख रुपयांची निविदा काढली आहे. त्यानंतर हा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.

यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त (इस्टेट) पृथ्वीराज बी.पी. यांच्याशी संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळाला नाही.

गायब झालेल्या वस्तू

  • अॅक्वागार्ड
  • सॅमसंग कंपनीचा
  • 45 इंच आणि
  • 65 इंच असे दोन
  • एलईडी टिव्ही
  • 2 स्प्लीट एसी
  • 2 टॉवर एसी
  • कॉफीचे मशिन
  • वॉकीटॉकी
  • सेट
  • झुंबर
  • जुने पितळी दिवे
  • रिमोट बेल्स
  • किचन टॉप.

10 वर्षांपूर्वी महापौर बंगल्यातून चोरी

घोले रस्त्यावरील महापौर बंगल्यातून 10 वर्षांपूर्वी एलईडी टीव्ही चोरीला गेला होता. त्यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील चोर अद्यापि सापडलेला नाही. आयुक्त बंगल्यातून साहित्य गायब झाल्याप्रकरणी अद्यापि गुन्हा दाखल केला नाही.