
नो-एन्ट्रीतून दुचाकी चालविल्याप्रकरणी विचारपूस करणाऱ्या वाहतूक अमलदाराला धक्काबुक्की केल्याप्रकरणी तरूणाला वानवडी पोलिसांनी अटक केली. ही घटना 5 जुलैला साडेपाचच्या सुमारास गोळीबार मैदानाजवळ घडली.
शफाक अशफाक शेख (वय 26 रा.कौसरबाग, कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अमर साळवे यांनी वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
गोळीबार मैदानानजीक असलेल्या परिसरात अमर साळवे वाहतूक नियमन करीत होते. त्यावेळी दुचाकीवर नो एन्ट्रीतून आलेल्या शफाक याला त्यांनी विचारपूस केली. त्याचा राग आल्यामुळे शफाकाने अमर यांना धक्काबुक्की करीत अपशब्द वापरले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संतोष गायकवाड तपास करीत आहेत.































































