
नवनाथ शिंदे
प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडताना निःपक्षपातीपणाची भूमिका घेणे गरजेचे आहे. असे असतानाही पुणे पोलीस दलाच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी नियमांना तिलांजली देत पदाचा गैरवापर करीत राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग केले. त्यांच्या विचारसरणीच्या पक्षाला फायदा होईल अशा गोपनीय माहितीचे रेकॉर्ड भाजपच्या बड्या नेत्याना पुरविल्याप्रकरणी रश्मी शुक्लाविरूद्ध गुन्हा दाखल झाला. प्रत्यक्षात मात्र, आता हे ‘शुक्ला’काष्ठ नेमके कोणकोणत्या राजयकी नेत्यांसह वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गदा आणणार हे काही दिवसांतच सिद्ध होणार आहे.
बेकायदा फोन टॅपिंग केल्याप्रकरणी माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरूद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात तार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय पक्षाच्या नागपूरमधील वजनदार मंत्र्यांसोबत आरे-कारे अशी असलेल्या जुन्या ओळखीतून त्यांनी हे प्रकरण घडवून आणल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रात सत्तेवर आल्यानंतर फोन टॅपिंगद्वारे स्वतःच्या पक्षातील वरचढ ठरू पाहणाऱ्या नेत्यांना घेरण्यात आले. त्यांचे पत्ते साफ करण्याचा डाव एका बड्या नेत्याने प्रशासकीय अधिकाऱ्यासोबत हातमिळवणी करीत रचला. त्यासाठी तत्कालीन माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचे कार्ड वापरण्यात आले. नागपूरमधील जुन्या ओळखीसह सत्तेतील सरकारचा आपल्याचा फायदा होईल यासाठी त्यांनी अधिकाराचा गैरवापर करण्यास सुरूवात केली.
भाजपचे माजी खासदार आणि काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपचे राज्यसभा खासदार संजय काकडे, भाजपचे माजी आमदार आशिष देशमुख आणि भाजपसोबत समविचारी विद्यमान मंत्री बच्चू कडू यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी नागपूरच्या बड्या मंत्र्याने फोन टॅपिंगचे अस्त्र बाहेर काढले. त्यांच्याकडून होणारे कॉल, संपर्कातील व्यक्ती, पक्षासह स्वतःला दगाफटका होतोय की काय याची भीती, वैयक्तिक गोपनीय संभाषण पडताळूण धोबी पछाड डाव टाकला. प्रत्यक्षात मात्र, कायद्यानुसार कोणाचाही फोन टॅपिंग करण्यासाठी पोलीस आयुक्ताना फक्त सहा दिवसांची परवानगी आहे. त्यासाठीही राज्य स्तरावर प्रशासकीय वरिष्ठ पातळीवर परवानग्यांचे दिव्य पार करावे लागते. मात्र, शुक्ला यांनी जाणीवपुर्वक आणि हेतूपरस्पर फोन टॅपिंग केले. एकीकडे लोकप्रतिनिधींचे फोन गैरपद्धतीने टॅपिंग होउ नये यासाठी राज्य सरकारच्या गृहविभागाकडून संबंधित घटकप्रमुखाकडून (पोलीस आयुक्त) विवरणपत्र भरून घेतले जाते. मात्र, ते विविरपत्र भरताना शुक्ला यांनी खोटी माहिती दिल्याचे उघडकीस आले आहे. दुसरीकडे भाजपच्या बड्या नेत्यानेच स्वःपक्षासह समविचारी पक्षातील चारजणांचे मोबाईल क्रमांक वेगवेगळ्या नावाने टॅपिंग करण्यास सांगितले. त्यानुसार तब्बल 60 दिवस नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यात आले. मोबाईल क्रमांक टॅपिंगसाठी लावताना त्यांची संपूर्ण माहिती न दिल्यामुळे संबंधित नंबर कोणाच्या नावावर आहेत, हे प्रशासनाला समजू शकले नाही.
राजकीय वदरहस्ताचा आवेश
राजकीय वरदहस्त लाभल्यामुळे मला कुणाीच भीती याच आवेषामध्ये रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगला लावले. याप्रकरणात कुणालाही संशय येऊ नये, त्यासाठी त्यांनी नेत्यांना कोडवर्ड दिले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मोबाइल क्रमांक अमजद खान नावाने टॅपिंग केला. तत्कालीन आमदार आणि विद्यमान शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचा मोबाइल निजामुद्दीन शेख यांच्या नावाने रेकॉर्ड केला. माजी आमदार आशिष देशमुख यांचा मोबाइल क्रमांक रघु चोरघे आणि हिना साळुंखे नावाने, माजी खासदार संजय काकडे यांचा मोबाइल तबरेज सुतार आणि अभिजित नायर नावांनी ‘टॅपिंग’ला लावण्यात आला होता. फोन टॅपिंगच्या फोरमॅटमध्ये बसण्यासाठी संबंधित नेत्यांना थेट गुन्हेगारांचे लेबल चिटकविण्यात आले. कथित गुन्हेगारांचा सहभाग अत्यंत गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यात असल्याचा दावाही करण्यात आला. त्याशिवाय फोन टॅपिंगची परवानगी घेताना सीएएफ जोडला नव्हता. त्यामुळे परवानगी देताना क्रमांक कोणाच्या नावावर आहेत, ही गोष्ट लक्षात आली नाही.
राज्य गुप्त वार्ता विभागात मोकळे रान
नागपूरमधील बड्या नेत्याच्या सांगण्यानुसार पुण्यात अपेक्षित फोन टॅपिंग झाले होते. त्यानंतर रश्मी शुक्ला यांची राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. पोलीस आयुक्त पदावर असताना फोन टॅपिंग करताना मर्यादा होत्या. मात्र, राज्य गुप्त वार्ता विभागात त्यांना रान मोकळे झाले. दरम्यान, काही राजकीय नेत्यांचे फोन टॅप करून त्यांचे संभाषण भाजप सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना पुरविल्याचा आरोप शुक्लाविरूद्ध करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने तत्कालिन पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नियुक्त केली. समितीचा अहवालानुसार फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांचा थेट संबंध असल्याचे उघडकीस आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.



























































