
धायरीतुन नानापेठेत आलेले बाळ खेळत असताना हरविले होते. परंतु, समर्थ पोलिसांनी बाळाच्या आईचा शोध घेऊन बाळाला तात्काळ नातेवाईकांकडे दिले. बाळ मिळाल्याने नातेवाईकांनी समर्थ पोलिसांचे मनापासून आभार मानले.
रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एका महिलेला एक दोन वर्षाचा लहान मुलगा रडताना व काहीतरी शोधत असल्याचे दिसले. त्या महिलेने बाळाला नानापेठ पोलीस चौकीस आणून दिले. बाळ हे काही न ऐकता सातत्याने रडत होते. लहान असल्याने त्याला स्पष्ट काही सांगताही येत नव्हते. नानापेठ पोलिस चौकीत दिवसपाळी कर्तव्यावर असलेले ड्युटी अंमलदार पोलीस हवालदार विजय कदम यांनी बाळाला बिस्कीट खाऊ देवून शांत केले. कदम यांनी लहान बाळाचे नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी त्याचा फोटो लागलीच पोलिस ठाण्याच्या वॉट्सअप ग्रुपवर पाठवून माहिती दिली. तसेच भागात पेट्रोलिंग साठी असलेले पोलिस शिपाई सुरज घनवट, पोलीस शिपाई नितीन दळवी यांना बोलावून घेवून सदर लहान बाळाचा मोबाईल मध्ये फोटो घेवून, शोध घेण्यास सांगितले. त्यानंतर पोलीस कर्मचार्यांनी शोध सुरू केला.
त्यांनी बाळाच्या नातेवाईकांचा नानापेठ मासळी बाजार, नानापेठ भाजी मंडई, धान्य मार्केट अशोक चौक अशा ठिकाणी शोध घेतला परंतु त्यांना कोणीही मिळाले नाही. पोलिस शिपाई सुरज घनवट लहान बाळाच्या नातेवाईकांचा शोध घेत असताना अल्पना थिएटर चौकाजवळ एक महिला रडत रडत लोकांना काहीतरी चौकशी करीत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी महिलेकडे विचारपुस केली. तिने तिचे नाव- शाहीन आयुबअली सय्यद असून अभिरुची मॉल शेजारी, वडगाव, धायरी येथे राहत असल्याचे सांगितले. ती नानापेठेत तिच्या नातेवाईकाडे आली असल्याचे सांगून तिचे 02 वर्षाचे लहान बाळ मुलांसोबत खेळताना हरविले असल्याचे सांगितले. तसेच बराचवेळ शोध घेवून देखील ते मिळत नसल्याचे रडत रडत सांगितले. तेव्हा घनवट यांनी महिलेला धीर देत नानापेठ पोलिस चौकीत आणले. पोलिस चौकीत आल्याबरोबर महिलेला तिचे बाळ दिसल्याने आईने आवाज देताच सदरचे लहान बाळ पळत त्याचे आईचे कुशीत गेले. पोलीसांनी लहान बाळाला सुखरुप शोधून, तिला मिळवून दिल्याबद्दल बाळाच्या आईने आणि नातेवाईकांनी तिचे आभार मानले. समर्थ पोलिस ठाण्यात अंतर्गत येणार्या नानापेठ पोलीस चौकीचे पोलीस हवालदार विजय कदम , पोलीस शिपाई सुरज घनवट व पोलीस शिपाई नितीन दळवी यांनी बाळाचा शोध घेऊन त्याला त्याच्या आईच्या ताब्यात सुखरूप दिले.





























































