पुणे पोलीस आयुक्तालय झालेय लोकाभिमुख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pune-police

>>नवनाथ शिंदे

पुणे शहरातील नागरिकांच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देत विविध उपक्रम राबवून पुणे पोलिस आयुक्तालयाचा चेहरामोहरा बदलून  गेला आहे. भरोसा सेल, क्रीप्स उपक्रम, सेवा उपक्रम, सीसीटीव्हींचे जाळे, टेक्नोसॅव्हीद्वारे विविध अ‍ॅपची निर्मिती, सायबर सेल, पोलीस पाल्यांसाठी अभ्यासिका, आयुक्तालयातील बदल, पासपोर्ट पडताळणीतील तत्परता, पोलिसांकडून सात मिनीटांमध्ये दिला जाणाऱ्या रिस्पॉन्समुळे नागरिकांमध्ये पोलिसाबद्दल विश्वासहर्ता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दीड वर्षांपूर्वी पोलीस आयुक्त पदाची सूत्रे ताब्यात घेणारे डॉ. के. व्यंकटेमशम यांच्या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

सेवा उपक्रमातंर्गत नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल आपुलकीची भावना निर्माण झाली आहे. तक्रार नोंदविल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत तक्रारींचे निवारण झाले की नाही, पोलिसांनी तुम्हाला सहकार्य केला का, कारवाईबद्दल तुम्ही समाधनी आहात का अशी चौकशी फोनद्वारे पोलिस ठाण्यांकडून केली जात आहे. त्यामुळे कधीही पोलीस ठाण्याची पायरी न ओलांडणारे किरकोळ कामांसाठी पोलिसांची मदत घेत आहेत. मागील काही महिन्यात शहरातील  नागरिकांमध्ये पोलीस ठाणे हक्काची ठिकाणी झाली आहे. सेवा उपक्रमातंर्गत आतापर्यंत तब्बल 2 लाखांवर नागरिकांना प्रतिसाद देण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाकडून नाविण्यपूर्ण योजना, टेक्नोसॅव्हीचा वापर करून नागरिकांना मदतीचा हात दिला जात आहे. भरोसा सेलमुळे  महिलांना दिलासा मिळाला असून सासू-सुनेची भांडणे, पती-पत्नीचा वाद, सासरच्या मंडळींकडून केला जाणाऱ्या छळास आळा बसला आहे. भरोसा सेलच्यावतीने तक्रारदार महिलांना समुपदेशन केले जात आहे. आतापर्यंत 2 हजार 600 हून अधिक महिलांच्या तक्रारींची सोडवणूक करून त्यांचा संसार सुरळित केला आहे. तर जेष्ठ नागरिक कक्षामुळे 700 प्रकरणातील जेष्ठांचे वादविवाद संपुष्टात येण्यास मदत  झाली आहे.

पासपोर्ट पडताळणीतही पुणे पोलिसांनी हनुमान उडी घेत देशभरात अव्वल स्थान पटकाविले आहे. पोलिसांकडून पाच दिवसांमध्ये पासपोर्टचे व्हेरिफिकेशन केले जात असल्यामुळे नागरिकांची विदेशवारी सुलभ झाली आहे. तर सायबर सेलच्या गतीमानतेमुळे तक्रारदारांना ऐवज परत मिळण्यास मदत झाली आहे. सायबरकडून विविध ऑनलाईन फसवणूकीच्या गुन्ह्यातील 3 कोटींवर ऐवज परत देण्यात आला आहे. चोरी, घरफोडीसह इतर फसवणूकीच्या गुन्ह्यातील  16 कोटींवर ऐवज पोलिसांनी नागरिकांना मिळवून दिला आहे. त्यामध्ये अनेक जेष्ठ दाम्पत्य, आधारहीन महिलांसह कुटूंबांचा समावेश असून ऐवज मिळाल्याने अनेकांना आनंदाश्रू अनावर झाले आहेत. नोकरदार महिलांच्या सुरिक्षततेसाठी असलेल्या बडीकॉप अ‍ॅपद्वारे 37 हजार तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.  पोलिस पाल्यांच्या शैक्षणिक हितासाठी वसतीगृहाची उभारणी करुन मोलाची भूमिका बजावली आहे. त्यानुसार राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिसांची 150 पेक्षा जास्त मुले अत्यल्प खर्चात शिक्षण घेत आहेत.  शहरातील वाहतूक यंत्रणा सुरळित करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. त्यानुसार शिस्तीत वाहन चालविणाऱ्यांना आभार योजनेतंर्गत 50 हजारांवर वाहनचालकांना सवलत कुपन्स वितरित करण्यात आले आहेत. तसेच सतर्क अ‍ॅपची निर्मिती करुन नागरिकांकडून वाहन चालकांविषयी तक्रारी स्वीकारून 2 लाखांवर बेशिस्तांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

स्थानिक दुकानदार,  व्यवसायिक, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून तब्बल 32 हजार 800 सीसीटीव्हींचे जाळे नागरिकांच्या सुरिक्षततेला बळकटी मिळाली आहे. सीसीटीव्हींचे फुटेज तपासून 165 हून अधिक गुंडांना जेरबंद करण्यास मदत झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखत गुंडाच्या मुस्क्या आवळण्यासाठी विशेष प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. विशेषतः क्रीप्स उपक्रमाद्वारे 12 हजारांवर गुडांची वुंâडली तपासण्यात आली. त्यानुसार कारवाईचा बडगा उगारण्यात आल्यामुळे 55 टक्क्यांनी गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हद्दीतील गुंडाची चौकशी करून थेट तुरुंगात रवानगी केली जात असल्यामुळे टोळीयुद्ध, मारामाऱ्या, खून, संघटनात्मक गुन्हेगारीला वेसण घालण्यात पोलिस प्रशासनाला यश आले आहे.  पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या नानाविध योजना राबविण्यासाठी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत मोठी यंत्रणा कार्यरत आहे. त्यामुळे अशा लोकोपयोगी उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये पोलिसांच्या भूमिकेबद्दल जागृकता वाढली आहे.