विजर्सन कालावधीत कोणतीही चोरीची घटना नाही, शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवाची वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यात अतिशय साधेपणाने विसर्जन सोहळा पार पडला. विसर्जनासाठी तब्बल 7 हजारांचा पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे शहरात कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

कोरोनामुळे यंदा विसर्जन मिरवूकांना बंदी घालण्यात आली होती. मात्र, तरीही मानाच्या ‘श्रीं’चे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी शिस्तबद्ध नियोजन केले होते. भाविकांसाठी शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्त्यासह अप्पा बळवंत चौक परिसरात अडथळे टाकण्यात आले होते. दरवर्षी मानाच्या मंडळाच्या ‘श्रीं’चे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होते. यंदाच्या वर्षी उत्सवावर कोरोनाचे सावट असल्यामुळे मिरवणूक रद्द करण्यात आल्या होत्या. दरवर्षीप्रमाणे उत्सव मंडपात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी मागणीवर सकाळपासून अप्पा बळवंत चौक ते हुतात्मा चौक (बुधवार चौक), लक्ष्मी रस्त्यावरील सोन्या मारुती चौक ते लिंबराज महाराज चौक, शिवाजी रस्त्यावरील लाल महाल चौक ते बेलबाग चौक रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता. मात्र तरीही मंगळवारी दिवसभर परिसरात भाविकांची गर्दी दिसून आली. शिवाजी रस्त्यावरुन भाविकांना दर्शनासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या दिशेने सोडण्यात येत होते. अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना करण्यात आल्या. या भागातील गल्ली-बोळात बॅरिकेट्स टाकण्यात आले होते. रात्री नऊनंतर या भागातील अडथळे बाजूला काढण्यात आले.