रेमडेसिव्हर इंजेक्शनच्या काळाबाजाराचा डाव उधळला, पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेमीडेसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या चार जणांचा डाव पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने उधळला आहे. संबंधितांना अटक करून त्यांच्याकडून चार इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत. रोहिदास बनाजी गोरे (रा. गोरेवस्ती, वाघोली), इम्तीयाज युसूफ अजमेरी (वय 52, रा. खराडी), परवेज मैनोद्दीन शेख (वय36, रा. खराडी), अश्विन विजय सोळंकी (वय 41, रा. येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

रेमीडेसिव्हिर इंजेक्शनचा काळा बाजार रोखण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पथकांची स्थापना केली आहे. त्यानुसार काल गुन्हे शाखेच्या युनीट चारचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप जमदाडे पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी वाघोली परिसरात एकजण इंजेक्शनची विक्री 10 हजार रूपयांना करणार असल्याची माहिती पोलीस हवालदार रमजान शेख यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाला माहिती देउन संबंधिताकडे बनावट ग्राहक पाठविले. त्यानंतर इंजेक्शनची जादा दराने विक्री करणाऱ्या रोहिदास गोरेला ताब्यात घेउन त्याच्याकडील दोन इंजेक्शन जप्त केले. त्याच्याविरूद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युनीट चारने केलेल्या दुसऱ्या कारवाईत नगर रस्त्यावरील एका पेट्रोलपंपाजवळ तिघेजण इंजेक्शनची 18 हजारांना विक्री करणार असल्याची माहिती पोलीस हवालदार रूपेश वाघमारे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने बनावट ग्राहक पाठवून तिघाजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत. पुणे पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत 7 इंजेक्शन जप्त करून 7 जणांना अटक केली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या पथकाने केली आहे.