प्रहारचे कार्यकर्ते टेरेसवर, सहकार मंत्र्यांची गाडी अडवण्याचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

सोलापूर आणि सातारा जिह्यातील साखर कारखान्यांकडून गतवर्षीच्या हंगामातील 1400 कोटी रुपये थकीत प्रश्नी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्यासह सोमवारी शेतकऱयांनी साखर आयुक्त कार्यालयावर धडक देत थेट आयुक्तालयाच्या टेरेसवर चढून बसल्याने एकच खळबळ उडाली. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याच कारखान्याची एफआरपीची रक्कम थकीत असल्याचा प्रश्न उपस्थित केला. तसेच यापुढे सहकार मंत्र्यांची गाडी अडविण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.

प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अचानक केलेल्या आंदोलनामुळे गोंधळ उडाल्याने पोलीस बंदोबस्त तत्काळ मागवण्यात आला. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी चर्चेदरम्यान कडू यांनी गावागावांमध्ये साखर उतारा समिती स्थापन करण्याची मागणी केली. उताऱयाबरोबरच उसाच्या वजनाची काटामारी होत असल्याची तक्रार केली असता आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबत सर्व माहिती घेऊन योग्य तो प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात येईल, असे आश्वासन दिले.