
बंगालच्या उपसागरात द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने आणि स्थानिक वातावरणातील बदलामुळे पुणे शहरासह जिल्ह्यात रात्री पावसाने थैमान घातले. त्यामुळे झालेल्या दुर्घटनेत 12 जण ठार झाले आहेत. यात 7 पुरूषांचा आणि 5 महिलांचा समावेश आहे. तसेच या पावसामुळे 60 जनावरंही दगावल्याची माहिती देण्यात आली आहे. पुण्यामध्ये अवघ्या दोन दिवसात 150 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून ऑक्टोबर 2011 मध्ये एकाच दिवसात झालेल्या पावसानंतर बुधवारी झालेल्या पावसाची सरासरी सर्वाधिक असल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे.
पुणे – कुत्र्याला वाचवायला गेलेल्या 14 वर्षीय मुलावर काळाने घातली झडप
पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. शहरात ढगफुटी सदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून ओढ्या-नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे शेकडो घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले. तर 150 घरांचे नुकसान झाले आहे. बुधवारी मध्यरात्री अरण्येश्वर परिसरातील टांगेवाला कॉलनीत पाणी शिरल्यामुळे स्थानिक नागरिक गंगातीर्थ सोसायटीजवळ थांबले होते. त्यावेळी पाण्याच्या प्रवाहामुळे सोसायटीची भिंत कोसळून पाच जण ठार झाले. तर काही नागरिक पाण्यात वाहून गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
पावसाच्या रुद्रावतारामुळे कात्रज, कोंढवा, वानवडी, इंद्रायणीनगर, सिंहगडरस्ता, बिबवेवाडी, आंबिल ओढा कॉलनी, कोथरुड, पद्मावती, मित्रमंत्रळ कॉलनी, आंबेगाव बुद्रुक परिसर, धायरी फाटा, सातारा रस्ता, वारजे माळवाडी परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत.
कात्रज परिसरातील लेकटाउन सोसायटीजवळील पूल वाहून गेल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरभरातील रस्त्यांवर पाणी वाहिल्यामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले असल्यामुळे वाहतूकीचा वेग मंदावला आहे. सातारा रस्ता, पद्मावती, धायरी परिसरात वाहतूक संथगतीने सुरू असून चिखल, दगडगोटे, रस्त्यांवरील खड्डे पडल्याने वाहतूककोंडीत अधिकच भर पडली आहे. पावसाच्या थैमानामुळे आंबिल ओढ्यातील पात्रातून मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर वाहिल्याने पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच अनेक ड्रेनेजवरुन पाणी वाहत असल्यामुळे रस्ते जलमय होउन खड्डेयुक्त झाले आहेत. दोन दिवसात झालेल्या सर्वाधिक पावसामुळे शहरात हाहाकार माजला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी रात्रभर शहराला पावसाने वेठीस धरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
10500 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले
शहरात पावसामुळे उद्भवलेल्या पूरसदृश्य परिस्थितीनंतर अग्निशमन दलाबरोबर एनडीआरएफच्या तीन तुकड्यांना पाचारण करण्यात आले आहे. पुणेशहर आणि कात्रजजवळ प्रत्येकी एक टीम तर बारामतीसाठी एक टीम तैनात करण्यात आली आहे. आंबील ओढ्यातील पाण्याच्या प्रवाहाने घराची भिंत कोसळल्यानंतर एनडीआरएफला पाचारण करण्यात आले होते. कालच्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक लोक पाण्यात अडकून पडले होते. दरम्यान, आज सकाळपर्यंत एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल 10500 नागरिकांना सुरळितस्थळी हलविले आहे. पावसाचे उसंत दिल्यानंतर मदत कार्याला वेग आला होता.
अरण्येश्वर टांगेवाला परिसरात भिंत कोसळून ठार झालेल्यांची नावे –
रोहित भारत आमले (वय 14)
जान्हवी सदावरे (वय 35)
श्रीतेज जगन्नाथ सदावरे (वय 8)
संतोष सहदेव कदम (वय 55)
मच्छिंद्र पांडुरंग वाबळे (वय 42)
लक्ष्मी पवार (वय 69)
पाण्यात वाहून गेल्याने ठार झालेल्यांची नावे –
जोत्सत्ना राणे (वय 35)
दत्तात्रय गिरमे (वय 52)
अमृता सुदामे (वय 37)





























































