पुणे – कुत्र्याला वाचवायला गेलेल्या 14 वर्षीय मुलावर काळाने घातली झडप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. बुधवारी रात्री पावसाचा जोर आणखी वाढल्याने बऱ्याच रहिवासी भागामध्ये पाणी शिरले. यात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुण्यातील टांगेवाला कॉलनीजवळ राहणाऱ्या 14 वर्षीय रोहित आमले याचाही समावेश आहे. पुराच्या पाण्यातून कुत्र्याला वाचवताना त्याच्यावर काळाने झडप घातली.

Video : पूरात अडकलेल्या दहा महिन्याच्या बाळाची टबमधून केली सुटका

‘माय मेडिकल मंत्रा’ने दिलेल्या वृत्तानुसार, रोहित आपल्या कुटुंबीयांसोबत पुण्यातील टांगेवाला कॉलनीजवळ राहायचा. बुधवारी रात्री साडेअकरा वाजता पाऊस धुमाकूळ घालत असताना रोहितच्या घरामध्येही पाणी शिरू लागले. घरात शिरलेला पाणी हळूहळू रौद्र रूप धारण करू लागताच रोहितने आपल्या कुटुंबीयांना बाहेर सुरक्षित स्थळी हलवले. आजीला घराबाहेर आणल्यानंतर त्याला आपल्या छोट्या कुत्र्याची आठवण झाली. कुत्र्याला आणतो असे आजीला सांगून निघालेला रोहित परत आलाच नाही.

याबाबत बोलताना रोहितचे मामा तेजस म्हणाले, रोहित कुत्र्याला वाचवण्यासाठी घरी गेला होता. कुत्र्याच्या पिल्लाला घेऊन येत असताना त्याच्यावर इमारतीची भिंत पडली. त्या भिंतींखाली दबून रोहित आणि कुत्र्याचा मृत्यू झाला. रोहितची आई तो लहाण असतानाच वारली होती. त्यामुळे तो पुण्यात आपल्या आजीसोबत राहत होता. तो दहावीमध्ये शिकत होता आणि अभ्यासातही हुशार होता, असेही त्यांनी सांगितले.

आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू
मंगळवार रात्रीपासून कोसळणारा पाऊस पुणेकरांच्या जिवावर उठला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये झालेल्या धुवांधार पावसामुळे पुण्यातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले. अनेक भागांमधील गाड्या, वाहनं, जनावरं वाहून गेली. अनेक ठिकाणी घरं कोसळली आहेत. याता आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 7 पुरुषांचा आणि 5 महिलांचा समावेश असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. तर दोन जण बेपत्ता झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.