पुणे- सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर नातेवाइकाचा बलात्कार, उरुळी देवाची गावातील घटना

पुणे जिल्ह्यातील उरुळी देवाची गावात नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. मावशीच्या नवऱ्याने दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर वारंवार लैंगिक अत्याचार केले आहेत.

पीडित मुलींच्या आईने लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून नराधम आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडित मुली 13 आणि 14 वर्षे वयाच्या आहेत.

आरोपी सावत्र बहिणीचा नवरा

पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांच्या सावत्र बहिणीचा नवरा आहे. फिर्यादी उरुळी देवाची गावात दोन्ही मुलीसह राहतात. आरोपी पुरंदर तालुक्यातील भिवरी गावातून नेहमी फिर्यादी यांच्या उरुळी देवाची येथील घरी येत होता.

पीडित मुलीला फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने आणि कपडे घेऊन देण्याच्या बहाण्याने बाहेर घेऊन जात होता. त्यानंतर तो दोन्ही मुलींना लॉजवर घेऊन जात त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. जानेवारी 2020 पासून हा सर्व प्रकार सुरू होता.

पीडित मुलीच्या आईला काही दिवसांपासून मुली घरामध्ये गप्प राहत असल्याचे दिसले. त्यांचा अशा वागण्याचा मुलीच्या आईला संशय आला. त्यांनी दोन्ही मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता पीडित मुलींनी घडलेला सर्व प्रकार सांगितला.

त्यानंतर फिर्यादीने लोणी काळभोर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत आरोपीविरोधात बाल लैंगिक संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक झिंजूर्के करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या