‘उजनी’तून 15 दिवसांत तिसऱ्यांदा विसर्ग

पुणे जिह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणाची पूरपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सोमवारी दुपारी 3 वाजता 16 दरवाजांतून 1 लाख 25 हजार क्युसेक वेगाने पाणी भीमा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. यावर्षी ‘उजनी’तून चौथ्यांदा 1 लाख क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे. या 15 दिवसांत तीनवेळा विसर्ग सोडण्यात आला आहे.

सोमवारी सकाळी दौंड येथून 1 लाखाच्या वर विसर्ग वाढल्याने उजनीतून मोठय़ा प्रमाणात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे पंढरपूर येथील पूरस्थिती कायम राहणार आहे. सायंकाळी 6 नंतर दौंड येथील विसर्गात घट होत चालल्याने भीमा नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे. सायंकाळी 6 वाजता 84 हजार 802 क्युसेक विसर्ग दौंड येथून सुरू आहे. पावसाने उघडीप दिल्याने विसर्ग हळूहळू कमी करण्यात येणार आहे.

पुणे जिह्यात पाऊस सुरू असल्याने दौंड येथील विसर्गात वाढ झाली होती. यामुळे पंढरपूरसह भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्या परतीचा मान्सून सुरू असून, उजनी लाभक्षेत्रातील मुसळधार पावसामुळे उजनी धरणाची पाणी पातळी वाढत आहे.

सध्या उजनी धरणाची पाणीपातळी 100 टक्क्यांपर्यंत स्थिर ठेवण्यात आली आहे. उजनीची क्षमता 111 टक्क्यांपर्यंत असून, उजनीत 123 टीएमसीपर्यंत पाणी साठवण क्षमता आहे. सध्या 117.23 टीएमसी पाणीसाठा ठेवण्यात आला आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे उजनीतून चौथ्यांदा 1 लाख आणि त्यापेक्षा जास्त विसर्ग सोडण्यात आला आहे. 20 ऑगस्ट, 15 सप्टेंबर, 27 सप्टेंबर आणि 29 सप्टेंबर रोजी 1 लाखापेक्षा जास्त विसर्ग सोडण्यात आला आहे. उजनी लाभक्षेत्रात आत्तापर्यंत 692 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.