
बांधकाम व्यावसायिकाला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन, रास्तापेठेतील महागडी जागा आणि तब्बल दोन कोटींच्या खंडणीची मागणी करत दीड लाख रूपयांची खंडणी उकळल्या प्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्त्याला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता प्रथमवर्ग न्यायालयाने त्यांना 29 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
विशाल शिवाजी ढोरे (36), अस्लम मंजूर पठाण (24, दोघेही रा. मांजरी, हडपसर) आणि सिद्धार्थ महिंद्र डांगी (28, रा. उत्कर्ष सोसायटी, कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणात कथित पत्रकार देवेंद्र फुलचंद जैन, संबंधित महिला, बडतर्फ पोलिस हवालदार शैलेश हरिभाऊ जगताप यांना जामीन मंजूर झाला आहे. तसेच पोलिस कोठडी वाढवून मिळण्यासाठी केलेली पुर्नविचार याचिका सत्र न्यायालयाने फेटाळली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र लक्ष्मण बर्हाटे (रा. लुल्लानगर चौक, कोंढवा), अमोल सतीश चव्हाण (रा. चव्हाण वाडा पुणे) यांचा शोध सुरू आहे. बांधकाम व्यावसायिक सुधीर वसंत कर्नाटकी (64, रा. राजगड, शिवतीर्थनगर, पौड रोड, कोथरूड) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2019 दरम्यान शिवतीर्थनगर कोथरूड येथे घडला.
कोथरूड पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये अटक केलेल्या तिघांना पळून जाण्यासाठी बर्हाटे याला मदत केली आहे. त्याला नवीन सिमकार्ड खरेदी करून दिले आहे. चौघेही 8 जुलै रोजी हे चौघेही लक्ष्मी कॉलनी परिसरात भेटले. तेथून ते बर्हाटे याला सोलापूर येथे घेऊन गेले. तेथे त्यांनी त्याला अमोल नागरसे नावाच्या व्यक्तीच्या घरात ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अटक केलेल्या या तिघांना बर्हाटेच्या ठाव ठिकाण्याबाबत माहिती आहे, त्याला पनवेल, लोणावळा आणि सोलापूर या ठिकाणी लपविल्याचेही निष्पन्न झाले आहे. त्या अनुषंगाने गुन्ह्यात वापरलेल्या गाड्याही जप्त करायच्या असल्याने तिघांना दहा दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली.
































































