
सॅनिटायझर बनविणाऱ्या एसव्हीएस अॅक्वा टॅक्नोलॉजिस कंपनीत शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत किमान 17 कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी संध्याकाळी चारच्या सुमारास मुळशी एमआयडीसीतील उरवडे गावातील वंâपनीत आग लागली होती. आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमक दलाला यश आले आहे. अद्यापही काही बेपत्ता झालेल्या कामगारांची शोधमोहिम सुरू असून मृतांची संख्या वाढण्याची भीती प्रशासनाने दिली आहे. कामगारांच्या मृत्यूमुळे नातेवाईकांसह कुटूंबियावर शोककळा पसरली आहे.
मुळशी एमआयडीसीतील उरवडे गावात एसव्हीएस अॅक्वा टॅक्नोलॉजिस कंपनी आहे. संबंधित कंपनीत सॅनिटायझरसह विविध उत्पादने घेतली जातात. सोमवारी 40 ते 50 कर्मचारी वंâपनीत काम करीत होते. त्यावेळी शॉटसर्किटमुळे एका विभागात अचानक आग लागली. सॅनिटायझरमुळे आग वेगाने पसरल्यामुळे 37 कामगार अडकले होते. त्यानंतर एमआयडीसी आणि पीएमआरडीए अग्निशमक दलाच्या 9 गाड्या आणि 11 रूग्णवाहिका घटनास्थळी धाव घेउन आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, प्रचंड धुराच्या लोटामुळे आग विझविण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. अथक प्रयत्नानंतर जवानांनी आग विझवून बेपत्ता कामगारांची रात्री उशिरापर्यंत शोधमोहिम सुरू ठेवली होती. रात्री आठवाजेपर्यंत 17 कामगारांचे मृतदेह आढळून आले.
आगीत अडकलेल्या कामगारांची नावे
अर्चना कवडे, सचिन घोडके, संगीता गोंडे, मंगल मोरगळे, सुरेखा ताप, सुमन ढेबे, सुनीता साठे, संगीता पोलेकर, माधुरी अंबरे, मंदा कुलत, त्रिशला जाधव, अतुल साठे, सीमा बोराडे, गीता दिवाडकर, शीतल खोपकर, सारिका कुदळे, धनश्री शेलार
होरपळल्याने कामगारांचा कोळसा
शॉर्टसर्किटमुळे कंपनीत भीषण आगीत होरपळून कामगारांचा अक्षरशः कोळसा झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटविण्यात प्रशासनाला रात्री उशिरापर्यंत यश आले नव्हते. दरम्यान, आगीत होरपळून मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह ससून रूग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी संग्राम शिर्के यांनी दिली आहे.
”उरवडे गावातील कंपनीत लागलेल्या भीषण आगीत 15 ते 16 कामगार अडकले होते. त्यापैकी रात्री सातवाजेपर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. बेपत्ता कामगारांची शोधमोहिम सुरू असून घटनास्थळी अग्निशमक आणि पोलिस काम करीत आहेत.” – डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण





























































