पुणे सिंकदराबाद शताब्दी एक्सप्रेसला, आजपासून पारदर्शक विस्टाडोम कोच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या पुणे ते मुंबई मार्गावरील तसेच मडगाव शताब्दी यांना लावण्यात आलेल्या पारदर्शक छताच्या विस्टाडोम कोचला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या आर्थिक वर्षांत चार महिन्यांतच 33 हजार प्रवाशांद्वारे मध्य रेल्वेला विस्टाडोम कोचमुळे सुमारे चार कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे आता आजपासून पुणे ते सिंकदराबाद शताब्दी गाडीलाही विस्टाडोम कोच बसविण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेने सर्वात आधी मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसला 2018 मध्ये विस्टाडोम कोच बसविला होता. ही गाडी पूर्वी दादरवरून सोडण्यात येत होती. या गाडीला नंतर सीएसएमटी येथून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तिचे एलएचबी करण करण्यात आल्याने तिला नवा विस्टाडोम कोच बसविण्यात आल्याने कोकणच्या हिरव्या पाचू सारख्या नटलेल्या डोंगर रांगांचा पारदर्शक छताच्या ट्रेनमधून घेण्याची संधी प्रवाशांना मिळाली.

त्यानंतर मुंबई ते पुणे मार्गावरील डेक्कन एक्सप्रेसला 26 जून 2021 मध्ये पारदर्शक विस्टाडोम कोच बसविण्यात आला. यानंतर 15 ऑगस्ट 2021 मध्ये डेक्कन क्वीनला विस्टाडोमची भेट मिळाली. तर 25 जुलै 2022 पासून प्रगती एक्सप्रेसलाही विस्टाडोम कोच बसविण्यात आला. मुंबई ते पुणे मार्गावर त्यामुळे तीन विस्टाडोम कोच बसविण्यात आले आहेत. त्यामुळे सह्याद्रीच्या पर्वत रांगा, खंडाळा आणि लोणावळा यांचे पावसाळ्यातील सौदर्य टिपण्याची संधी प्रवाशांना मिळाली.

अनंतगिरी पर्वत, उजनी बॅकवॉटर, धबधबे पाहा

आता मध्य रेल्वेने आज 10 ऑगस्टपासून पुणे ते सिंकदराबाद शताब्दी एक्सप्रेसला विस्टाडोम कोच बसविला आहे. त्यामुळे उजनी बॅकवॉटर, भिगवन जवळचा डॅम, अनेक बेटं तसेच स्थलांतरीत पक्ष्यांचा सहवास, विकाराबाद येथील अंनगगिरी पर्वत रांगांचे सौदर्य पाहता येणार आहे. सिंकदराबाद शताब्दी ट्रेन क्र.12025 (मंगळवार वगळून) पुण्याहून स.6 वा.सुटते आणि सिंदराबादला दु.2.20 वा.पोहचते. तसेच सिंदराबादहून (मंगळवार वगळून) 2.45 वा. सुटून पुन्हा पुण्याला रा. 11.10 वा. पोहचते.

– आर्थिक वर्षे 2022 ते 23 पहिल्या चार महिन्यात कमाई – 3.99 कोटी रू.
– एप्रिल ते जुलै चार महिन्यात लाभलेले प्रवासी – 33821

विस्टाडोमची वैशिष्ट्ये –

– काचेचे पादर्शक छत
– आयताकृती मोठ्या खिडक्या,
– 360 डिग्रीतून फिरणारी आसने
– पुशबॅक आरामदायी आसने
– ऑटोमॅटिक स्लाइडिंग डोअर्स,
– स्पेशल व्ह्यूइंग गॅलरी