
शहरातील बाबा भिडे पुलानजीक नदीपात्रात सेल्फी काढण्यास उतरलेले दोन तरुण वाहून गेल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे ते वाहत गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाकडून रात्री उशिरापर्यंत शोध मोहिम सुरु होती. ओम तुपधर (वय – 18) आणि सौरभ कांबळे (वय – 20, दोघेही रा. ताडीवाला रोड) अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
ओम आणि सौरभ मित्र असून ताडीवाला परिसरात राहायला होते. दोघांनाही सेल्फी काढण्याचा छंद होता. आज दुपारी त्यांनी एका मित्रासोबत कपड्यांची खरेदी केली होती. त्यानंतर तिघेजण दुचाकीवरुन भिडे नदीपात्रातून ताडीवाला रस्त्याकडे निघाले होते. त्यावेळी पूलापासून 20० मीटर अंतरावर नदीपात्रालगत फोटो काढण्यासाठी ओम आणि सौरभ खाली उतरले होते. फोटो काढत असताना अचानक ओमचा पाय घसरल्यामुळे तो पाण्यात पडला. त्यामुळे सौरभ त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे सौरभही पाण्यात पडला.
दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे ते पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेले. त्यांच्या एका मित्राने तातडीने घटनेची माहिती अग्निशमक दलासह पोलिसांना दिली. त्यानंतर अग्निशमक दल आणि डेक्कन पोलिसांनी तातडीने धाव घेत शोध मोहिम सुरु केली. घटनास्थळी सहायक पोलीस आयुक्त , पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस निरीक्षक आर. टी. माने यांनी भेट दिली. परिसरात तरुणांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी करीत हंबरडा फोडला होता.
सेल्फीचा हव्यास नकोच
फिरायला गेल्यानंतर अनेक धोकादायक ठिकाणी तरुण-तरुणींकडून सेल्फीला प्राधान्य दिले जाते. मात्र, त्याठिकाणच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यामुळे अपघाताच्या अनेक घटना घडल्याचे वारंवार दिसून आले आहे. त्यामुळे धोकादायक ठिकाणी सेल्फीचा हव्यास नकोच, अशी चर्चा घटनेनंतर नागरिकांमध्ये सुरु झाली आहे.
‘नदीपात्रात सेल्फी घेत असल्यामुळे तोल गेल्यामुळे एक तरुण पाण्यात पडला होता. त्यास वाचविताना दुसराही तरुण पडल्यामुळे आणि त्यांना पोहता येत नसल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेले आहेत. अग्निशमक दलाकडून शोधमोहिम सुरु असून, पोलिसांकडून घटनेची नोंद केली जात आहे’, अशी माहिती डेक्कन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर. टी. चव्हाण यांनी दिली.






















































