
भरधाव वेगाने जाणाऱ्या रील स्टारची फॉर्च्यूनर गाडीची पाठीमागून धडक बसल्याने क्रेटा व व्हॅगनर या दोन्ही गोड्या एकमेकांवर आदळून अपघात झाला. यामध्ये तीनही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील मदनवाडी (सकुंडे वस्ती) गावच्या हद्दीत गुरुवारी हा अपघात झाला. याप्रकरणी फॉर्च्यूनर चालकाच्या विरोधात भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतीक राम शिंदे (वय 24, रा. भादलवाडी, ता. इंदापूर) असे अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.
निखिल बाळासाहेब होले (रा. अकलूज, सोलापूर) हे आपल्या धुंदाई क्रेटा कारमधून निघाले होते. टोयोटा फॉर्च्यूनरने त्यांच्या गाडीला पाठीमागील बाजूने जोरात धडक दिली.
धडक एवढी जोरात होती की, क्रेटागाडी पुढे असलेल्या मारुती व्हॅगनरवर जाऊन जोरात आदळली. यामुळे एका अपघातात तीन वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्रतीक शिंदेवर भारतीय न्याय संहिता कलम 281, 324 (4) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार महेश उगले करीत आहेत.
अपघातग्रस्त गाडी रील स्टारची
मोठा गाजावाजा करून रील स्टार प्रतीक शिंदे याने महिन्याभरापूर्वी फॉर्च्यूनर गाडी घेतली होती. मात्र, या गाडीला अपघात झाला आहे. पुणे सोलापूर महामार्गावरून जात असताना, शिंदेच्या गाडीने पुढे निघालेल्या क्रेटा कारला पाठीमागून धडक दिली. प्रतीक हा स्वतः गाडी चालवत होता. धडकेचा जोर एवढा होता की, क्रेटापुढे असलेल्या मारुती व्हॅगनरवर आदळली. काही क्षणात तीनही गाड्या एकमेकांत आपटून लाखो रुपयांचे नुकसान झाले.