Solapur News – पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरची दुचाकीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

पुणे सोलापूर महामार्गावरील वेणेगाव हद्दीत पंढरपूर चौकातील उड्डाण पुलाजवळ कंटेनरने पाठीमागून दोन दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (26 जुलै 2025) रोजी दुपारी 1 वाजण्याचा सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पंढरपूर उड्डाण पुलाखाली कंटेनर चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला व सोलापूरच्या दिशेने निघालेल्या दोन दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली यामध्ये दुचाकी वरील प्रेमसुख राधाकृष्ण जंगीड (वय 44) तसेच दुसऱ्या दुचाकी वरील तानाजी तुकाराम खंडाळे (वय 69) हे दोघेही कंटेनर खाली चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच टेंभुर्णी ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे व ट्रॉफीक पोलिसांनी अपघातस्थळाकडे धाव घेऊन सोलापूर पुणे महामार्गवरील वाहतूक सुरळीत सुरू केली.

हा अपघात एवढा विचित्र होता की, प्रेमसुख जंगीड यांची दुचाकी कंटेनर खाली अडकून त्यांचा कमरेच्या वरच्या भागाचा पूर्ण चेंदा मेंदा झाला होता. तर तानाजी खंडाळे यांना दुचाकीसह कंटेनरने 100 मिटर अंतरापर्यंत फरफटत नेले यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. यावेळी क्रेन बोलावून अडकलेली दुचाकी व कंटेनर बाजूला करण्यात आला. अपघातानंतर दोन्ही मृतदेहांचे टेंभुर्णी येथील प्राथमीक आरोग्य केंद्रात शव विच्छेदनासाठी हलवण्यात आले असून कंटेनर चालक फरार झाला आहे.