
पुणे स्टेशन भागातील ताडीवाला रस्ता परिसरात दहशत माजविणार्या गुंड टोळीवर बंडगार्डन पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली.
प्रतीक सुनील काकडे (वय 22), रोहन उर्फ पांड्या सुनील काकडे (वय 24), रामनाथ उर्फ पापा मेनीनाथ सोनवणे (वय 21), शुभम जीवन वानखेडे (वय 21, सर्व रा. ताडीवाला रस्ता) अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. टोळीप्रमुख सागर उर्फ सॅगी किशोर गायकवाड (वय 21) आणि एक साथीदार पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. ताडीवाला रस्ता परिसरात सागर गायकवाड आणि साथीदारांनी दहशत माजविली होती. पाळीव श्वानाला घेऊन निघालेल्या एकाला गायकवाड आणि साथीदारांनी मारहाण केली. त्याच्यावर गजाने हल्ला करुन खुनाचा प्रयत्न केला होता. कारवाईनंतरही सातत्याने गुन्हेगारी कृत्य करणार्या या टोळीच्या विरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी तयार केला होता. परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्यामार्फत हा प्रस्ताव मंजुरीसाठी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्याकडे सादर करण्यात आला. त्यांनी या प्रस्तावाला मंजूरी दिली. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली ही 17 वी कारवाई आहे.