
वॉशिंग सेंटरवर मित्राला भेटायला गेलेल्या एका अल्पवयीन मुलाने तेथे आलेल्या तिघांना गाडी पुसण्यासाठी कापड दिले नाही. त्याचा राग आल्यामुळे त्रिकुटाने संबंधित अल्पवयीनावर चाकूने वार करून खूनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना मांजरीतील गुरूकृपा ऑटो गॅरेजजवळ घडली. याप्रकरणी संदीप भैय्या पानसरे आणि त्याच्या दोन साथीदारांविरूद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अल्पवयीन मुलगा शिक्षण घेत असून सोमवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास मित्राला भेटण्यासाठी मांजरी परिसरातील गुरूकृपा ऑटो गॅरेजजवळ गेला होता. त्यावेळी तेथे दुचाकी धुण्यासाठी आलेल्या तिघांपैकी संदीपने अल्पवयीनाकडे गाडी पुसण्यासाठी कापड मागितले. मात्र, फिर्यादीने त्यांना कापड देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्यामुळे संदीपसह इतर दोघांनी अल्पवयीन मुलावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. एस. गाडेकर तपास करीत आहेत.



























































