
गादी वाहतुकीसाठी भाडोत्री घेतलेला टेम्पो पंधरा दिवसात परत दिल्याच्या रागातून टेम्पो चालकासह त्याच्या मित्राला रॉडने बेदम मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीनंतर टेम्पो घेऊन आरोपी पसार झाला.
याप्रकरणी राजु पठाण (वय 40) याच्यावर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अन्सार अली हा गंभीर जखमी झाला आहे. ऐजाज पिंजारी (वय 42) यांनी तक्रार दिली आहे.
ऐजाज हा टेम्पोतून उपनगरात गादी व उशा विक्रीचे काम करतो. त्याने राजु पठाण याचा टेम्पो भाडोत्री घेतला होता. पण, टेम्पो खराब असल्याने त्याने पंधरा दिवसात माघारी दिला. दुसरा टेम्पो घेऊन ऐजाज व्यवसाय करत होता. त्यामुळे राजुच्या मनात राग होता. दरम्यान, लोहगावमध्ये संतनगर येथून ऐजाज व त्यांचा मित्र अन्सारअली टेम्पोतून गाद्या घेऊन जात असताना त्यांना अडविले.
तुम्ही माझ्या टेम्पोचे नुकसान करून आता दुस?्या टेम्पोतून व्यवसाय करता का, असे म्हणत वाद घातला. ऐजाज टेम्पोतून बाहेर आले असता त्यांना रॉडने मारहाण केली. अन्सार अली भांडणामध्ये आला असता त्याच्या डोक्यात रॉड मारून गंभीर जखमी केले.
























































