पुणे – दोन खुनांनी शहर हादरले, पूर्ववैमनस्यातून हडपसर आणि कोथरूडमध्ये खुनाच्या घटना

2497
प्रातिनिधिक फोटो

पुणे शहरात एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी दोन खुनाच्या घटना घडल्या आहेत. पूर्ववैमनस्यातून दोन्ही खून झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून दोन्ही खुनाचे आरोपी पसार झाले आहेत. हडपसर आणि कोथरूड भागात या घटना घडल्या आहेत.

आकाश लक्ष्मण भोसले (वय 24, हडपसर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश हा चिकन विक्रेता आहे. सोमवारी चार वाजण्याच्या सुमारास त्याच्यावर अज्ञातांनी तीक्ष्ण हत्याराने सपासप वारकरून निर्घृण खून केला. त्यानंतर आरोपी पसार झाले. याची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे.

दुसरा खून काही वेळापूर्वी कोथरूड भागात घडला आहे. एका गॅरेज चालकाच्या डोक्यात वार करण्यात आले आहेत. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी कोथरूड पोलिसांनी धाव घेतली आहे. गॅरेज चालकाचे मारेकरी पसार झाले आहेत. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. अद्याप त्याबाबत पोलिसांनी काही माहिती जाहीर केलेली नाही. मात्र त्याचा मृत्यू झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले. दोन्ही खून पूर्ववैमनस्यातून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तर दुसरीकडे पुण्यातील खुनाचे सत्र थांबत नसल्याचे देखील दिसत आहे. दोन्ही खुनामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे

आपली प्रतिक्रिया द्या