
बांधकाम व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी आणि जमीन खरेदीत गुंतवणुकीच्या आमिषाने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे विरुद्ध दुचाकी चोरीचा गुन्हा लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दाखल केला आहे. याबाबत संतोष राजाराम गिरी (वय 39, रा.देवळे,ता.मावळ) यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गिरी यांची बऱ्हाटे यांच्याशी ओळख आहे. फसवणूक, खंडणी प्रकरणात बऱ्हाटेचे साथीदार बडतर्फ पोलीस शैलेश जगताप, पत्रकार देवेंद्र जैन यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर तो शहरातून पसार झाला. बहाटेंना पसार होण्यास मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली होती. दरम्यान, 11 जुलै रोजी बऱ्हाटे यांनी पहाटे साडेचारच्या सुमारास गिरी यांच्याशी संपर्क साधला होता. माझी मोटार बंद पडली आहे, अशी बतावणी केली होती. त्यानंतर बहाटे गिरी यांच्या घरी गेले. गिरी यांच्या घरी चहा प्याल्यानंतर मोटारीपर्यंत जाण्यासाठी दुचाकी घेऊन जातो. मोटारचालक पुन्हा दुचाकी घेऊन येईल, अशी बतावणी केली होती. त्यानंतर बहाटे गिरी यांची दुचाकी घेऊन पसार झाले. त्यांनी फसवणूक केल्याचे गिरी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे तपास करत आहेत.




























































