जैन बोर्डिंग जमीन व्यवहार अखेर रद्द, बिल्डर गोखलेंचे ट्रस्टींना पत्र

मॉडेल कॉलनीतील सेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंगचा जमीन खरेदी व्यवहार अखेर रद्द झाला आहे. या खरेदी व्यवहारातून माघार घेत व्यवहार रद्द केल्याचे पत्र बांधकाम व्यावसायिक विशाल गोखले यांनी ट्रस्टींना दिले आहे.

जैन बोर्डिंग जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी मोठे वादंग माजले होते. पुणे शहरासह राज्यभर तीव्र पडसाद उमटले. या व्यवहारात बिल्डर गोखले यांच्याबरोबर भाजपचे खासदार, केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे साटेलोटे असल्याचे आरोप झाले. जैन बोर्डिंग बचाव कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. जैन मुनींनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या जागेच्या विक्रीचा व्यवहार रद्द करावा, अशी याचिका धर्मदाय आयुक्तांकडे करण्यात आली होती. धर्मदाय आयुक्तांनी या जमीन खरेदी व्यवहाराला स्थगिती दिली होती.

आरोपांनंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जैन मुनींची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांना जैन समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. जैन समाजाच्या मनासारखा निर्णय होईल, असे आश्वासन मोहोळ यांनी शनिवारी दिले होते. त्यानंतर अखेर गोखले कन्स्ट्रक्शनने या व्यवहारातून माघार घेत असून, तो व्यवहार रद्द करण्यात यावा, असे पत्र ट्रस्टला दिले आहे.

230 कोटी परत करण्याची विनंती

नैतिकता आणि सामाजिक परिस्थिती पाहून या व्यवहारातून माघार घेत असल्याचे गोखले कन्स्ट्रक्शनने या पत्रात म्हटले आहे. तसेच ट्रस्टच्या विश्वस्तांकडे भरलेले व्यवहारातील 230 कोटी रुपये परत देण्याची विनंतीही करण्यात आली आहे. व्यवहार रद्द करण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करेन, असेही म्हटले आहे.