सुरक्षेसंबंधी गोपनीय बैठकीला मुलाची हजेरी, पंजाबचे मुख्यमंत्री चन्नींना भाजपने घेरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी अलिकडेच राज्याचे डीजीपी, वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि काही कॅबिनेट मंत्र्यांसोबत उच्चस्तरीय गोपनीय बैठक घेतली. या बैठकीतील मुख्यमंत्र्यांचा चिरंजीव रिदमजीत सिंहच्या हजेरीमुळे वादाला तोंड फुटले आहे. यापूर्वी तीन वेळा आमदार आणि माजी मंत्री राहिलेल्या चन्नींना प्रशासकीय नियम चांगलेच माहीत आहेत, असा टोला लगावून भाजपने त्यांना कोंडीत पकडले आहे.

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री चन्नी यांनी गुरुवारी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांवर टीका झाली आहे. हे पूर्णतः बेकायदेशीर आणि दुदैवी आहे, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष अश्वनी शर्मा यांनी जोरदार हल्ला चढवला. संवैधानिक नियम आणि कायद्यांचे नेहमीच पालन केले पाहिजे. त्यांची विश्वासार्हता, प्रतिष्ठेचे रक्षण केले पाहिजे, अशी जाणीव शर्मा यांनी करून दिली आहे. बैठकीला वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांनीही मुख्यमंत्र्यांच्या मुलाला बैठकीला बसण्यास परवानगी दिली ही दुर्दैवी बाब आहे, अशा शब्दांत शर्मा यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱयांच्या कार्यपद्धतीवरही तीव्र नाराजी व्यक्त केली.