
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
‘मास्टर स्ट्रोक’ या आपल्या प्राईम टाइम शोमध्ये केंद्र सरकारच्या धोरणांविरोधातील टीकात्मक चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेऊ नका. तसेच त्यांची छबी आणि व्हिडीओ फुटेजही दाखवू नका, असा दबाव ‘एबीपी न्यूज’च्या मालकांनी आपल्यावर आणला होता, असा गौप्यस्फोट ऍन्कर पुण्यप्रसून वाजपेयी यांनी केला आहे. त्यांनी ‘एबीपी न्यूज’चा राजीनामा दिल्यानंतर ‘द वायर’ या न्यूज पोर्टलवर लेख लिहून मोदी सरकारची दडपशाही आणि वृत्तवाहिन्यांनी पत्करलेल्या शरणागतीचे ‘पोलखोल’ केले आहे.
जगात सर्वात मोठी लोकशाही असा लौकिक असलेल्या हिंदुस्थानातील केंद्र सरकारने लोकशाहीचा गळा आवळायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मोदी सरकारचे उठसूठ गोडवे गाणारी ‘चॅनल्स’ वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्यास धजावत नाहीत, असे वाजपेयी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी छत्तीसगडमध्ये महिलांशी साधलेल्या संवादावेळी ‘आपले शेतीचे उत्पन्न दुप्पट झाले आहे’, असा एका महिलेने केलेला दावा खोटा होता, हे वाजपेयी यांच्या ‘मास्टर स्ट्रोक’ शोमधूनच देशासमोर आले होते. त्या महिलेला मोदींसमोर तसा खोटा दावा करण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिकाऱयांनी पाठवले होते. तशी कबुली त्या महिलेनेच दिल्यामुळे मोदी सरकारची चांगलीच नाचक्की झाली होती. त्यानंतर केंद्रीय माहिती प्रसारण मंत्र्यांनी ‘मास्टर स्ट्रोक’ शोवर संताप व्यक्त केला होता.
- ‘मास्टर स्ट्रोक’चा तो शो ९ जुलै रोजी प्रसारित झाल्यानंतर नेमके त्या शोच्या वेळी रात्री ९ ते १० या वेळेत सॅटेलाइट सिग्नलअभावी अडथळे येऊ लागले होते. तसेच ‘एबीपी न्यूज’ला जाहिराती न देण्यासाठी जाहिरातदारांना धमकावले गेले होते.
- मी राजीनामा देऊन ‘एबीपी न्यूज’मधून बाहेर पडताच माझ्या शोच्यावेळी अडथळे आणणारी सॅटेलाइट सिग्नल यंत्रणा सुरळीत झाली. तसेच ‘पतंजली’च्या बंद करण्यात आलेल्या जाहिरातीही पुन्हा सुरू झाल्या.
- ९ जुलैच्या माझ्या ‘मास्टर स्ट्रोक’च्या वादळी शोनंतर चॅनलचे रेटिंग वाढले होते. पण भाजपने मात्र देशभरात त्या चॅनलवर बहिष्कार टाकला होता. ‘एबीपी न्यूज’च्या ‘ऍन्युअल समिट’कडेही मोदी सरकारने आणि भाजपने पाठ फिरवली होती.
- वृत्तवाहिन्यांवर माहिती प्रसारण खात्यातील एक टीम ‘वॉच’ ठेवत असते. त्यातील एका अधिकाऱयाने माझ्या त्या वादळी शोनंतर मला फोन केला होता. ‘आता काहीही घडू शकते. सांभाळून राहा’, असा इशारावजा सल्ला त्या अधिकाऱयाने मला दिला होता!
- ‘मास्टर स्ट्रोक’ शोच्या प्रसारणात सॅटेलाइट सिग्नलअभावी तीन दिवस व्यत्यय आल्यानंतर त्याची माहिती आम्ही प्रेक्षकांना देत होतो. पण त्याची ‘सूचना’ही मागे घेण्यास एबीपी न्यूजच्या व्यवस्थापनाला भाग पाडण्यात आले होते.
चॅनेल्सवर वॉच ठेवण्यासाठी मोदींची २०० जणांची टीम
वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांचा मजकूर, स्वरूप यावर ‘वॉच’ ठेवण्यासाठी मोदी सरकारच्या माहिती प्रसारण खात्यात अतिरिक्त महासंचालकांच्या नेतृत्वाखाली २०० जणांची फौज कार्यरत आहे. त्या ‘टीम’ने चॅनेल्सवरील बातम्यांबाबत दिलेला अहवाल आणि अभिप्रायावरून ‘पीएमओ’कडून वृत्तवाहिन्यांना सल्ले, समज दिली जाते. एखाद्या ‘चॅनल’ने सूचना पाळल्या नाहीत, तर मग मोदी सरकार सरळ वृत्तवाहिनीच्या मालकांना गाठते.





























































