विमानतळ भूसंपादन हरकतींवर होणार सुनावणी; नोटिशींवर 25 आणि 29 मेपर्यंत घेणार हरकती

पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळ बाधित शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या सातबारा उतारावर इतर हक्क सदरी शेरे मारल्यानंतर 25 आणि 29 मेपर्यंत लेखी अथवा प्रत्यक्ष हरकती आणि सूचना दाखल करण्यास मुदत देण्यात आली आहे. दाखल हरकतींवर भूसंपादन अधिकाऱ्यांपुढेच सुनावणी घेतली जाणार आहे.

जिल्हा प्रशासनाकडून विमानतळाच्या जागेसाठी रीतसर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. शेतकऱ्यांना 32 (2)अन्वये नोटिसा दिल्या आहेत. विमानतळ प्रकल्प बाधित असलेल्या वनपुरी, उदाचीवादी, कुंभारवळण, पारगाव, एखतपूर, मुंजवडी, खानवडी अशा सात गावांत विमानतळ प्रकल्पाची आखणी करण्यात आली असून यासाठी 2832 हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. भूसंपादनासाठी आवश्यक असलेली कायदेशीर प्रक्रिया प्रशासनाकडून जोरदारपणे राबवली जात आहे.

वनपुरी, कुंभारवळण, एखतपूर, खानवडी आणि पारगाव या गावांतील प्रकल्पांतर्गत येणाऱ्या जमिनीवर शिक्के मारण्याची कार्यवाही उद्यापर्यंत संपणार आहे. यामुळे आता कोणत्याही प्रकारे जमिनीचे हस्तांतरण खरेदी-विक्री किंवा महसूल दप्तरी अन्य नोंदी केल्या जाणार नाहीत, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

z प्रकल्पबाधित सातही गावांतील मंडलाधिकारी आणि गाव कामगार तलाठी यांनी संबंधित गावातील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना नोटीस बजावण्याचे काम सुरू केले आहे. त्याचवेळी दुसरीकडे सातबारा पुस्तकावर बाधित शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर विमानतळाचे शिक्के देखील मारले जात आहेत. उदाचीवाडी, मुंजवडी या गावांचे शिक्के मारण्याचे काम संपले. वनपुरी, उदाचीवाडी, पुंभार वळण आणि पारगावमधील भूसंपादनासाठी 29 मे रोजी तर खानवडी, एखतपूर आणि मंजवडीमधील हकरती 25 मेपर्यंत दाखल करता येतील.