पुण्यात उद्यापासून ‘‘पुश इंडिया पुश चॅलेंज’चा थरार; विजेत्यांना मिळणार एक कोटींची बक्षिसे

 ‘पुश इंडिया पुश चॅलेंज’ स्पर्धेच्या माध्यमातून आदर्श सोमानी यांनी देशभरात एक चळवळ सुरू केली आहे. पुण्यामध्ये बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात 15 ते 19 एप्रिलदरम्यान या पुश अप स्पर्धेचा थरार बघायला मिळणार आहे. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना एक कोटी 15 लाख रुपयांची पारितोषिके देऊन गेरविण्यात येणार आहे.

‘पुश इंडिया पुश’ या स्पर्धेत 18 वर्षांपुढील नागरिकांनाच सहभागी होता येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही, मात्र ऑनलाइन नावनोंदणी करणे अनिवार्य आहे. माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय मंत्री जनरल व्ही. के. सिंग हे या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळय़ाचे प्रमुख पाहुणे असतील. यावेळी ‘पुश इंडिया पुश’चे संस्थापक आदर्श सोमानी, मेजर डॉ. सुरेंद्र पुनिया, एएफएमसीचे कमांडंट लेफ्टनंट जनरल कोतवाल, मुंबईचे पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश, महाराष्ट्राचे राज्य क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, स. प. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक रणजित चामले आदी मान्यवर स्पर्धेच्या उद्घाटन सोहळय़ाला उपस्थित राहणार आहेत. ‘पुश इंडिया पुश चॅलेंज’ या स्पर्धेसाठी देशभरातील 17 हजार नागरिकांनी सहभाग निश्चित केला आहे.