आजपासून इंटरसिटीने 2 तास 35 मिनिटांत पुणे गाठा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई ते पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसने आता प्रवाशांना 2 तास 35 मिनिटांत पुणे गाठता येणार आहे. मुंबई ते पुणे धावणार्‍या इंटरसिटी एक्स्प्रेसला पुढे आणि मागे अशी दोन इंजिने लावून उद्या, 31 मेपासून 6 जूनपर्यंत ‘पुशपूल’ चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन महानगरांतील प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ 35 ते 40 मिनिटांनी वाचणार आहे.

मुंबई ते पुणे धावणार्‍या इंटरसिटी एक्स्प्रेसला एलएचबी डबे असून मध्य रेल्वेच्या नाशिक मार्गाने धावणार्‍या राजधानीनंतर या ट्रेनला डबल इंजिन लावण्यात आले आहे. तर डेक्कन क्वीन आणि पंचवटी एक्स्प्रेसला यानंतर डबल इंजिन लावून ‘पुशपूल’ तंत्राने त्यांचा वेग वाढविण्याची मध्य रेल्वेची योजना आहे. पुणे इंटरसिटीने मुंबई ते पुणे अंतर गाठण्यासाठी पूर्वी 3 तास 15 मिनिटे लागायची. आता डबल इंजिनांच्या शक्तीने 2 तास 35 मिनिटांचा वेळ हे अंतर कापण्यास लागणार आहे. 

कर्जतला थांबा नाही !

या ट्रेनला पूर्वी कर्जत येथे बँकर लावण्याकरिता थांबा दिला जात होता. आता नव्या वेळापत्रकानुसार तो रद्द करण्यात आला आहे. जरी कर्जतला कमर्शियल थांबा नसला तरी बरेच प्रवासी तेथून गाडी पकडायचे, परंतु आता येथे ही गाडी थांबणार नसल्यामुळे कर्जतहून बसणारे प्रवासी नाराज झाले आहेत. 

जाताना 40 मिनिटांची बचत

मुंबई ते पुणे इंटरसिटी (ट्रेन क्र. 12127) स. 6.40 वा. सीएसएमटीहून सुटते आता ती स. 6.45 वा. सुटणार आहे. आणि पुण्याला ती स. 9.57 वा. पोहचायची ती आता स. 9.20 वा.पोहचणार आहे. म्हणजे जाताना सुमारे 40 ते 42 मिनिटांची बचत होईल. तर येताना ट्रेन क्र. 12128 पुण्याहून ती सायंकाळी 5.55 ऐवजी ती 6.30 वा. सुटणार असून सीएसएमटीला ती पूर्वीप्रमाणे रा. 9.05 वा. पोहचेल. म्हणजेच 35 मिनिटांची बचत होणार आहे.