‘वर्ल्ड चॅम्पियन’वर चित्रपट येणार, सिंधूच्या भूमिकेसाठी दीपिकाला पहिली पसंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानची आघाडीची बॅडमिटनपटू पी.व्ही. सिंधू हिने रविवारी जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धा जिंकण्याचा बहुमान पटकावला. ही स्पर्धा जिंकणारी सिंधू एकमेव हिंदुस्थानी खेळाडू आहे. सिंधूच्या विजयानंतर देशवासियांसह बॉलिवूडमध्येही आनंदाचे वातावरण आहे. अभिनेता सोनू सूद याने सिंधूला विजयाच्या शुभेच्छा दिल्या. परंतु हा विजय सिंधूसह सोनूसाठीही खास आहे. कारण ‘वर्ल्ड चॅम्पियन’ सिंधूच्या आयुष्यावर बनणाऱ्या चित्रपटाला सोनू प्रोड्यूस करत आहे.

ऑलिम्पिक रौप्यपदक आणि जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीप विजेती पी.व्ही. सिंधू हिच्या आयुष्यावर आधारित चित्रपटावर सोनू सूद बऱ्याच काळापासून काम करत आहे. या चित्रपटाचे नाव ‘सिंधू’ असे असणार असून लवकरच याचे चित्रिकरण सुरू होण्याची शक्यता आहे. परंतु सिंधूने आता जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धा जिंकल्याने या चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये थोडा बदलही होण्याची शक्यता आहे.

सिंधूच्या बायोपिकवर बोलताना सोनू म्हणाला की, कोणताही बायोपिक बनवण्यापेक्षा त्याची कथा लिहिणे आणि त्या भूमिकांसाठी पात्रांची निवड करणे कठीण असते. सिंधूसारख्या खेळाडूवर बायोपिक बनवताना तिच्या भूमिकेला न्याय देणे आवश्यक आहे. याला वेगळ्या अंगाने दाखवणे योग्य असणार नाही.

सिंधूची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न सोनूला विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला की, वर्ल्डक्लास खेळाडूच्या भूमिकेसाठी तुम्हा या खेळाला समजणाऱ्या पात्राची निवड आवश्यक आहे. ही भूमिका कोण करणार हे सांगणार नाही, परंतु आपची पहिली पसंती दीपिका पदुकोण आहे. कारण तिला हा खेळ उत्तम खेळताही येतो आणि ती समजूनही घेऊ शकते. तिच्याशी संपर्क करण्यापूर्वी स्क्रिप्ट फायनल करण्याकडे आमचा कल होता. आम्ही एक स्क्रिप्ट दीपिकालाही पाठवल्याचे सोनू म्हणाला. तसेच प्रशिक्षक गोपीचंद यांच्या भूमिकेसाठी मी स्वत: प्रयत्न करणार असल्याचे त्याने सांगितले.


View this post on Instagram

History is made ✌️Such a proud moment for our country. So proud of you my friend. ❤️. @pvsindhu1 #bwfbadminton

A post shared by Sonu Sood (@sonu_sood) on