सिंधूचा टोमोकावर थरारक विजय, चीन ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धा

दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू हिने जपानच्या टोमोका मियाझाकी हिच्यावर थरारक विजय मिळवीत ‘चीन ओपन बॅडमिंटन’ या प्रतिष्ठsच्या बीडब्ल्यूएफ सुपर 1000 स्पर्धेत महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

चीनच्या ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटर जिम्नॅशियममध्ये बुधवारी पार पडलेल्या या सामन्यात 15 व्या मानांकित हिंदुस्थानच्या पी. व्ही. सिंधूने आपल्या लढवय्या खेळाचा प्रत्यय देत सहाव्या मानांकित टोमोका मियाझाकी हिच्यावर 21-15, 8-21, 21-17 असा विजय मिळविला. दुसऱया गेममध्ये पिछाडीवर गेल्यानंतरही निर्णायक गेममध्ये सिंधूने सुरुवातीपासून आघाडी राखत विजयावर शिक्कामोर्तब केले.

पुरुष दुहेरीत जागतिक क्रमांक 12 असलेल्या सात्त्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या हिंदुस्थानी जोडीनेही शानदार खेळ करीत आगेकूच केली. या हिंदुस्थानी जोडीने जपानच्या केन्या मित्सुहाशी आणि हिरोकी ओकामुरा या जोडीचा 21-13, 21-9 असा सरळ गेम्समध्ये सहज पराभव केला, मात्र महिला दुहेरीत हिंदुस्थानच्या ऋतपर्णा आणि स्वेतपर्णा पांडा या भगिनींना अनुभवी हाँगकाँग चायना जोडीविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.