चायना ओपन बॅडमिंटन : सिंधूला पराभवाचा धक्का

604

नुकतीच जगज्जेती बनलेली हिंदुस्थानची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला चायना ओपन वर्ल्ड टूर सुपर 1000 स्पर्धेत गुरुवारी दुसर्‍या फेरीतच धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. 15 व्या मानांकित थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंग हिने पाचव्या मानांकित सिंधूचे स्पर्धेतील आव्हान 12-21, 21-13, 21-19 असे संपुष्टात आणले.

24 वर्षीय सिंधूने 58 मिनिटांपर्यंत रंगलेल्या या लढतीत पहिला गेम आरामात जिंकून झकास सुरुवात केली होती, मात्र पार्नपावी हिने दुसरा गेम तितकाच सहजतेने जिंकून लढतीत बरोबरी साधली. त्यानंतर तिसर्‍या व निर्णायक गेममध्ये उभय खेळाडूंमध्ये एकएका गुणासाठी पाठशिवणीचा खेळ रंगला, मात्र शेवटी पोर्नपावी हिने हा गेम जिंकून लढतीत बाजी मारली. आता उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या खेळाडूची गाठ चीनच्या चेन यू फेई हिच्याशी पडेल. चेन हिने दक्षिण कोरियाच्या एन से यंग हिचा 20-22, 21-17 असा पाडाव करून आगेकूच केली. सिंधूच्या पराभवासह हिंदुस्थानी महिला एकेरी खेळाडूंचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. बुधवारी सायना नेहवाल हिला सलामीलाच पराभवाची नामुष्की पत्करावी लागली होती.

साई प्रणीतची आगेकूच

हिंदुस्थानचे महिला एकेरीतील आव्हान संपुष्टात आले असले तरी पुरुष एकेरीत बी. साई प्रणीतने चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीत धडक दिली. त्याने दुसर्‍या फेरीत चीनच्या लू गुआंग जू याचा चुरशीच्या लढतीत 21-19, 21-19 असा पराभव केला.

रंकीरेड्डी-शेट्टी जोडी पराभूत

सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी या हिंदुस्थानी जोडीचेही गुरुवारी चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. हिंदुस्थानच्या या बिगरमानांकित जोडीला ताकेशी कामुरा व केइगो सोनोदा या चतुर्थ मानांकित जपानी जोडीने 21-19, 21-8 असे हरविले. रंकीरेड्डी-शेट्टी जोडीने अवघ्या 33 मिनिटांत लढत गमावली.

आपली प्रतिक्रिया द्या