शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर पीव्हीआरची माघार, हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याचे लाइव्ह प्रसारण रद्द

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात असलेली तीव्र जनभावना व शिवसेनेने दिलेल्या इशाऱ्यानंतर ‘पीव्हीआर आयनॉक्स’ने आशिया कपमधील हिंदुस्थान-पाकिस्तानच्या फायनल सामन्याचे लाइव्ह प्रसारण रविवारी रद्द केले. देशभरात पीव्हीआरच्या कुठल्याही थिएटरमध्ये हा सामना दाखवला गेला नाही.

हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याचे लाइव्ह प्रसारण करण्याचा निर्णय पीव्हीआरने घेतला होता. तशा जाहिरातीही सुरू केल्या होत्या. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर पोस्ट लिहून पीव्हीआर आयनॉक्सच्या व्यवस्थापनाला खडसावले होते.

‘‘या जाहिराती खरोखरच घृणास्पद आहेत. दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या नागरिकांचा आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये लढलेल्या शूर जवानांचा हा अपमान आहे. पहलगाम हल्ल्याच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत. हिंदुस्थानात व्यवसाय करताना हे विसरू नका,’’ असे आदित्य ठाकरे यांनी सुनावले होते.

आदित्य ठाकरे यांच्या या इशाऱ्यानंतर शिवसंचार सेनेचे अध्यक्ष अखिल चित्रे यांनी पीव्हीआर व्यवस्थापनाची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर पीव्हीआरने माघार घेत क्रिकेट सामन्याचे सर्व शो रद्द केले.