दिव्यांग मतदारांसाठी ‘पीडब्ल्यूडी’ ऍप; राज्यात 2 लाख 24 हजार दिव्यांग मतदार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्यातील दिव्यांग मतदारांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदान करणे अधिक सोयीचे होणार आहे. कारण दिव्यांगांना मतदानासाठी विविध सुविधा देण्याबरोबरच केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदा त्यांच्यासाठी ‘पीडब्ल्यूडी’ हे नवीन मोबाईल ऍप विकसित केले आहे. या ऍपवर मतदान केंद्रांच्या माहितीपासून व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध होणार आहे. दिव्यांगांना निवडणूक आयोगाने यंदा दिव्यांग मतदारांसाठी ‘सुलभ निवडणुका’ हे घोषवाक्य तयार केले आहे.

राज्यात यंदा दिव्यांग मतदारांची संख्या 2 लाख 24 हजार 162 इतकी आहे. यात अंधत्व किंवा कमी दृष्टी असलेले 37 हजार 324, मूकबधिर 24 हजार 77, शारीरिक अपंगत्व असलेले 1 लाख 8 हजार 22 तर इतर अक्षमता असलेले 54 हजार 39 दिव्यांग मतदार आहेत. दिव्यांगांना मतदानाकडे आकर्षित करण्यासाठी तसेच त्यांच्यासाठी मतदान प्रक्रिया अधिकाधिक सुलभ व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने यंदा  पुढाकार घेतला आहे. अपंगांना मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश निवडणूक आयोगामार्फत सर्व जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले आहेत. दिव्यांगांना सुविधा देण्यासाठी जिल्हास्तर तसेच राज्यस्तरावर सुकाणू समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रांवर दिव्यांगांना रांगेशिवाय प्रवेश, संख्या अधिक असल्यास दिव्यांगांसाठी स्वतंत्र रांग, रॅम्प सुविधा, अधिक प्रकाश व्यवस्था, व्हीलचेअर जाऊ शकेल असा मोठा दरवाजा, दिव्यांगांसाठी स्वतंत्र पार्किंग आदी सुविधा असणार आहेत.