
उदय जोशी । बीड
आजाराची लागण होऊन पूर्ण हालचाल बंद झालेला घायाळ अजस्त्र अजगर बीड-अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर वडगाव येथे आढळून आला होता. तब्बल आठ महिने या अजगरावर सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र (तागडगाव जी .बीड) येथे उपचार सुरू होते. काल पूर्णपणे बरे झालेला हा अजगर वन अधिकाऱ्यांच्या उपस्थित जंगलात सोडून देण्यात आला.
बेलपारा प्रकल्पाच्या पायथ्याशी वडगाव येथील शेतकरी विकास शेळके यांना त्यांच्या ऊसाच्या शेतामध्ये हेअजगर घायाळ अवस्थेत ८डिसेंबर २०१७रोजी आढळून आला होता. त्यांनी या घटनेची माहिती सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राचे संचालक निसर्गमित्र सिद्धार्थ सोनवणे यांना दिली होती. त्यांनतर सोनवणे यांनी मरणावस्थेत असलेला हा अजगर पकडला. अजगर आजारी असून मरणावस्थेत असल्याची माहिती तात्काळ विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली या अजगरास पुढील उपचारासाठी सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले होते.
या अजगरास “अमेबीओसीस”या आजाराची लागण झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.विजय चौरे व डॉ. निलेश सानप यांना जाणून आले. त्यानंतर तब्बल आठ महिने या अजगरावर सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात उपचार व शुश्रूषेचे काम डॉ.विजय चौरे, डॉ. निलेश सानप व सर्पराज्ञीचे सिद्धार्थ सोनवणे, सृष्टी सोनवणे यांनी केले. अजगरासाठी लागणारी आर्थिक मदत मानवत येथील तलाठी उज्वल तवर यांनी दिली.
१ ऑगस्ट २०१८ रोजी पूर्णपणे बरा झालेला हा अजगर विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते यांच्या हस्ते त्याच्या मूळ नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. यावेळी सर्पराज्ञीचे संचालक सिद्धार्थ सोनवणे, सृष्टी सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी सायेमा पठाण, वनपाल दिगंबर फुंदे, वनरक्षक शोभा आघाव, शिवाजी आघाव आदी उपस्थित होते.
Summary: python cure in beed center

























































