सर्पमित्रांकडून अजगराला जीवदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उरण तालुक्यातील जासई येथील दगड खाणीच्या परिसरात लपलेल्या एका अजस्त्र अजगराला वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे सर्प मित्र आनंद मढवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पकडून त्याला चिर्ले येथील घनदाट जंगलात सोडून दिले.

जासई येथे अनेक दगडखाणी असून या डोंगराळ प्रदेशात अनेक घातक सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर असतो. अशाच एका दगडखाणीत तेथे काम करणाऱ्या कामगाराला एक अजस्त्र अजगर असल्याचे आढळून आले. भलामोठा अजगर दिसल्याने तेथे उपस्थित सर्व कामगार भयभीत झाले त्यांनी तत्काळ त्यांचे मालक मनोहर पाटील यांना ही बातमी फोनवर सांगताच त्यांनी चिर्ले येथील सर्प मित्र आनंद मढवी यांना फोन करून अजगर असल्याची कल्पना दिली. काही मिनिटातच सर्पमित्र आनंद मढवी आपल्या सहकाऱ्यांसह तेथे जाऊन त्यानी त्या अजस्त्र अजगराला मोठया शिताफीने पकडले.

त्या नंतर सर्प मित्राकडून वनखात्याला याची कल्पना देण्यात आली. वनखात्याचे अधिकारी शशांक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्र रक्षक सूरदास धांडे, किरण देवकर, मिलिंद भोईर, माया भोसले यांनी या अजगराचे मोजमाप घेण्यात आले. या अजस्त्र अजगराची अंदाजे लांबी 11 फूट दोन इंच तर याचे वजन 40 किलोपर्यंत असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. त्या अजगराची तपासणी करून त्याला वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी सुखरूप जंगलात सोडून दिले. यावेळी वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आनंद मढवी, सदस्य दिलीप मढवी आदी उपस्थित होते.